भ्रष्टाचार ही आपल्या देशाला लागलेली कीड समजली जाते. अगदी शिपायापासून मोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांचे हात यात बरबटले आहेत. अशीच एक कारवाई चंद्रपूर जिल्ह्यात करण्यात आली आहे.
उत्पादन शुल्क विभागाच्या वॉन्टेड अधिक्षकाला एसीबीने अटक केली आहे. एका बियर शॉपीच्या परवाना प्रकरणी अधीक्षक संजय पाटील यांनी अधिनस्थ 2 अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने 1 लाख लाचेसाठी होकार दर्शविला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोप फरार
बियर शॉपीच्या परवान्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी संजय पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणातील इतर आरोपी दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे व कार्यालय अधीक्षक अभय खताळ यांना सोमवारी जामीन देण्यात आला. मात्र, पाटील यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला होता. मागील 7 दिवसापासून उत्पादन शुल्क अधीक्षक संजय पाटील फरार होते. अखेर आज पाटील यांना लाच प्रकरणात बेड्या ठोकण्यात आल्या. पाटील साताऱ्यातील थंड हवेचे ठिकाण पाचगणी येथे लपून बसले होते. मूळ कोल्हापूरच्या संजय पाटील यांना न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. दारूबंदी उठविल्यावर जिल्ह्यातील सुमारे 1000 दारू दुकाने- बियर बार- देशी परवाने- बियर शॉपी यांच्या मंजुरीत झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहार चौकशीला यामुळे वेग येण्याची शक्यता आहे.
खारोडे, खताळ निलंबित; पाटील यांच्या निलंबनाचा प्रस्ताव
उत्पादन शुल्क विभाग, चंद्रपूरचे दुय्यम निरीक्षक खारोडे व कार्यालय अधीक्षक खताळ यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, तर उत्पादन शुल्क अधीक्षक संजय पाटील यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. दोन्ही अधिकारी 48 तासांपेक्षा अधीक काळ पोलीस कोठडीत होते. यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. पाटील यांना अटक झाल्याने त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकरणाची ‘एसआयटी’ चौकशी करावी, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.