आम्ही टॉपर घडवतो, देशातील टॉपर हा आमचाच विद्यार्थी, आमच्याकडील विद्यार्थ्यांना मिळतात पैकीच्या पैकी गुण, आम्ही डॉक्टर-इंजिनिअर घडविणारी फॅक्टरी असे भ्रामक दावे करत अनेक कोचिंग क्लासेस विद्यार्थ्यांना आकर्षित करतात. मात्र, आता अशा खोट्या जाहिराती केल्यास क्लासचालकांवर ग्राहक संरक्षण कायद्याच्या अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.
ग्राहक संरक्षण नियामकांनी (सीसीपीए) खासगी शिकवणी संदर्भातील मसुद्यावर हरकती मागवल्या आहेत. या क्षेत्रात दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना प्रतिबंध करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांवर नागरिक १६ मार्च पर्यंत सूचना व हरकती पाठवू शकतात. सीसीपीएने कोचिंग क्लासेस, कायदा संस्था, सरकारी आणि स्वयंसेवी ग्राहक संस्थांसह सर्व भागधारकांशी तपशीलवार सल्लामसलत केल्यानंतर मार्गदर्शक तत्त्वांचा मसुदा तयार केला असल्याचे अधिकृत निवेदनात म्हटले आहे.
‘मार्गदर्शक तत्त्वे खासगी शिकवणी क्षेत्रातील दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींपासून ग्राहकांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने आहेत. शिकवणी क्षेत्रातील कोणालाही ते लागू होतील. कोचिंग क्षेत्रातील दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींचे नियमन ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ नुसार केले जाईल. प्रस्तावित मार्गदर्शक तत्त्वे भागधारकांना स्पष्टता आणतील आणि ग्राहकांच्या हितांचे संरक्षण करतील.’
कोचिंग संस्थांवर ही बंधने..
– कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेतील यशाचा दर, निवड संख्या किंवा विद्यार्थ्यांच्या मानांकनाबाबत सत्यापित पुराव्याशिवाय खोटे दावे करणे टाळावे.
– विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक प्रयत्नांची कबुली न देता, विद्यार्थ्यांच्या यशासाठी केवळ कोचिंग जबाबदार आहे, असे भासवू नये.
– विद्यार्थी आणि पालकांमध्ये अशी खोटी भावना निर्माण करू नये की कोचिंग अत्यावश्यक आहे.
– कोचिंग संस्थांनी अशा कोणत्याही गोष्टीत गुंतू नये, ज्यामुळे ग्राहकांची दिशाभूल होईल किंवा ग्राहकांची स्वायत्तता नष्ट होईल.
– कोचिंग सेंटर्सने विद्यार्थ्यांच्या यशामध्ये कोचिंगचा सहभाग किती प्रमाणात आहे, हे स्पष्टपणे सांगितले पाहिजे.