पुणे |
पिंपरी चिंचवड शहर परिसरातून दुचाकी चोरणार्या बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरलेल्या एकवीस लाख 50 हजार रुपये किंमतीच्या 43 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
वाकड पोलिसांच्या तपास पथकाने ही कामगिरी केली.
नितीन राजेंद्र शिंदे (20, रा. शेकापुर, शिंदेवस्ती, आष्टी, बिड), केशव महादेव पडोळे (25, सध्या रा. बोडकेवाडी, माण, मुळशी मुळ रा. केळसांगवी, आष्टी, बिड), नवनाथ सुरेश मुटकुळे (24, रा. बालाजी कॉलनी, थेरगाव मूळ रा. पाथर्डी, अहमदनगर), ऋषीकेश अजिनाथ भोपळे (23, रा. पारगाव, जोगेश्वरी आष्टी, बिड), अमोल दगडू पडोळे (24, रा. केळसांगवी, आष्टी, बिड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी शहरातील वाढत्या दुचाकी चोरींच्या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली. दरम्यान, वाकडच्या तपास पथकातील सहायक निरीक्षक संतोष पाटील यांना माहीती मिळाली की, तापकीर मळा चौक, काळेवाडी येथे एकजण चोरीची दुचाकी घेऊन येणार आहे. त्यानुसार, पथकाने सापळा रचून आरोपी नितीन शिंदे याला ताब्यात घेतले. त्या वेळी त्याने रहाटणी येथून दुचाकी चोरी केल्याचे पोलिसांना सांगितले.
तसेच, त्याने अन्य आरोपींच्या मदतीने वाकड, हिंजवडी, बारामती, रांजणगाव, अहमदनगर कॅम्प, वाळुंज एमआयडीसी, पाथर्डी, कोतवाली, कर्जत आणि श्रीगोंदा परिसरातून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार, पोलिसांनी 21 लाख 50 हजार रुपये किंमतीच्या 43 दुचाकी जप्त केल्या आहेत. वरिष्ठ निरीक्षक सत्यवान माने, पोलिस निरीक्षक (गुन्हे) संतोष पाटील, पोलिस निरीक्षक रामचंद्र घाडगे, सहायक निरीक्षक संतोष पाटील, संभाजी जाधव, पोलिस अंमलदार बिभीषण कन्हेरकर, राजेंद्र काळे, वंदू गिरे, दीपक साबळे, प्रमोद कदम, प्रशांत गिलबिले, अतिक शेख, तात्या शिंदे, भास्कर भारती यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
संपर्क करण्याचे आवाहन
नागरिकांनी वापरलेली दुचाकी खरेदी करताना कागदपत्रांची पडताळणी करावी. तसेच, कोणीही कागदपत्रे नसताना दुचाकीची विक्री करीत असल्याचे निदर्शनास आल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
चोरीची दुचाकी घेणार्या 17 जणांवर कारवाई
शहरातून चोरलेली दुचाकींची आरोपी जिल्ह्याबाहेर विक्री करीत होते. काही नागरिकांनी कागदपत्रांची पडताळणी न करता केवळ अल्पदरात मिळत असल्याने खरेदी केल्या, तर काहींनी चोरीची माहिती असूनही दुचाकी खरेदी केल्याचे तपासात समोर आले आहे. अशा 17 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.