पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आडनावावरून बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर आज शुक्रवारी (ता. २४ मार्च) लोकसभा सचिवालयाने त्यांची खासदारकी रद्द करून त्यांना मोठा धक्का दिला.या प्रकरणी राजकीय वर्तुळात गदारोळ सुरु असतानाच आता राहुल गांधी यांनी या कारवाईबाबत मत व्यक्त केले आहे.
राहुल गांधी यांनी या कारवाईबद्दल मत व्यक्त करताना एक ट्विट केले आहे. “मैं भारत की आवाज़ के लिए लड़ रहा हूं।.. मैं हर कीमत चुकाने को तैयार हूं।” असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे.
२०१४ पासून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वक्तव्ये करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर २०२२ त्यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देखील मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ज्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात अनेक ठिकाणी आणि अनेक वेळा आंदोलने देखील केली. त्याचमुळे त्यांच्यावर करण्यात आलेली ही कारवाई राजकीय सूड भावनेतून करण्यात आल्याची माहिती देखील काँग्रेसकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, आमदार किंवा खासदाराला भारताच्या कोणत्याही सक्षम न्यायालयाने दोन किंवा अधिक वर्षांपेक्षा जास्त काळ शिक्षा सुनावली गेली तर त्याची आमदारकी किंवा खासदारी रद्द होईल, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने २०१३ साली दिला होता. लिली थॉमस विरुद्ध केंद्र सरकार या खटल्यामध्ये हा निर्णय दिला होता. अर्थात सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर सर्वपक्षीय नेत्यांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. तत्कालीन पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसचे सरकार होते. त्यामुळे सत्ताधारी युपीएच्या सर्वच घटकपक्षांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात एक अध्यादेश जारी करण्याचा निर्णय घेतला होता. या अध्यादेशातून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला विरोध दर्शवण्यात येणार होता. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाविरोधात तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने एक अध्यादेश आणला. डॉ. मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात शरद पवार, प्रणव मुखर्जी, कपिल सिब्बल यांसह अनेक दिग्गज नेते होते. या दिग्गज नेत्यांच्या अभ्यासांनंतरच या अध्यादेशाला मंजुरी मिळाली होती.
तसेच, राहुल गांधी हे सध्या दिल्लीतील ल्युटेन्स झोनमधील १२ तुगलक रोड येथे राहत आहेत. लोकसभा खासदार असल्याने राहुल गांधींना इथे सरकारी बंगला राहण्यासाठी दिला होता. या प्रकारच्या बंगल्यात सात खोल्या, घरगुती मदतनीसांसाठी स्वतंत्र क्वार्टर देखील असतात. परंतू आता राहुल गांधी यांचं खासदार पदच रद्द झाल्यानं ते बेघर होणार का? असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण राहुल गांधी यांनी यापूर्वी केलेल्या वक्तव्यानुसार राहुल गांधी याचं कोणतंच स्वतःच घर नाही. त्यात त्यांची आई सोनिया गांधी यांचं कोणतं घर नाही. अलहाबादमध्ये त्यांचं वडिलोपर्जित घर आहे. पण ते आमचं नाहीये, असं देखील राहुल गांधींनी सांगितलं होतं. त्यात आता खासदारकी रद्द झाल्यानं राहता सरकारी बंगला देखील रिकामा करावा लागणार आहे. त्यामुळे आता राहुल गांधी कुठे राहणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे.