नागपूर |
दोन गांजा तस्करांना गुरुवारी दहा वर्षे सश्रम कारावासाची कमाल शिक्षा सुनावण्यात आली. तसेच, एकूण चार लाख रुपये दंड ठोठावण्यात आला. सत्र न्यायालयाचे न्या. पी. वाय. लाडेकर यांनी हा निर्णय दिला.
सुनील बसंत मालवी (३३) व सोहेल खान शमीम खान (२४) अशी आरोपींची नावे असून ते मध्य प्रदेश येथील रहिवासी आहेत. तिसरा आरोपी नरेश ऊर्फ पप्पू जगदीशप्रसाद श्रीवास्तव याला ठोस पुराव्यांअभावी निर्दोष सोडण्यात आले. आरोपी नागपूर येथून मध्य प्रदेशात गांजाची तस्करी करीत होते.
७ ऑगस्ट २०२१ रोजी ते गांजाची मोठी खेप मध्य प्रदेशात घेऊन जाणार असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी मानकापूर येथील फरस परिसरात सापळा रचला आणि सकाळी ११ च्या सुमारास मालवी व खान यांना ताब्यात घेतले. दरम्यान, त्यांच्याकडे सात लाख रुपये किमतीचा ३५ किलो ३९० ग्रॅम गांजा मिळून आला. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध मानकापूर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला. न्यायालयात सरकारच्या वतीने ॲड. दीपाली गणगणे यांनी कामकाज पाहिले. त्यांनी विविध पुराव्यांच्या आधारावर आरोपींविरुद्धचे गुन्हे सिद्ध केले.