बीड |
जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्यभरातील शासकीय कर्मचारी संपावर गेले आहेत. या संपात वेगवेगळ्या विभागातील कर्मचारी आणि संघटनांनी आपला सहभाग नोंदवला आहे. दरम्यान, आता या संपात बीड जिल्ह्यातील सर्व शिक्षक, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सक्रियपणे सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून (20 मार्च) संप मिटेपर्यंत बीड जिल्ह्यातील सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय बीड जिल्हा शिक्षक, प्राध्यापक, संस्थाचालक, शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीने रविवारी घेतला आहे. त्यामुळे संपाची तीव्रता आता अधिक वाढणार आहे. मात्र याचा फटका विद्यार्थ्यांना बसणार आहे.
राज्यात सुरु असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपातील सहभागाबद्दल बीड जिल्हा शिक्षक, प्राध्यापक, संस्थाचालक, शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीची रविवारी बैठक झाली. बीड शहरातील तहसील कार्यालयातील हॉलमध्ये झालेल्या या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयात, यापुढे संपात सक्रियपणे सहभागी होण्याच ठरलं आहे. त्यामुळे आजपासून (20 मार्च) संप मिटेपर्यंत बीड जिल्ह्यातील सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, परीक्षा काळात शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने याचा फटका विद्यार्थ्यांना बसणार आहे.
बैठकीत यांची होती उपस्थिती…
समन्वय समितीचे अध्यक्ष बाबा बडे, निमंत्रक राजकुमार कदम, सरचिटणीस रामचंद्र ठोसर, मार्गदर्शक डी. जी. तांदळे, सुशिला मोराळे, उत्तम पवार, श्रीराम बहीर, दीपक घुमरे, राजेंद्र खेडकर, प्रा. सत्येंद्र पाटील, प्रा. चंद्रकांत मुळे, हरिदास घोगरे, विष्णू आडे, कालिदास धपाटे, गणेश आजबे, विजयकुमार समुद्रे, अनिल विद्यागर, मुजतबा अहेमद खान, आनंद पिंगळे, केशव आठवले, शेख इरशान, अंकुश निर्मळ, शेख मुसा, बाळकृष्ण आहिरे, रवींद्र खोड, संजय शिंदे आदी बैठकप्रसंगी उपस्थित होते.
या संघटना संपात आहेत सहभागी
मराठवाडा शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, ज्युक्टा, महाराष्ट्र शिक्षक संघटना बीड जिल्हा संस्थाचालक महामंडळ, डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद, अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटना.. राष्ट्रवादी शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, इंडियन बहुजन टिचर्स असोसिएशन (इब्टा), महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना, शिक्षक भारती बहुजन शिक्षक संघटना, जि. प. माध्यमिक व उच्च माध्यमिक कृती समिती, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना, अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ आदी सहभागी झाल्या आहेत.