- अवकाळी व गारपीटीने मराठवाडा-विदर्भातील शेतकऱ्यांवर आभाळ फाटलं, सरकार संवेदनशीलता दाखवा – मुंडेंची मागणी
- चर्चेतून समाधान न झाल्याने विरोधी पक्षांचा सभात्याग
मुंबई |
मागील तीन-चार दिवसात मराठवाडा, विदर्भासह जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस आणि गारपीट बरसते आहे, मराठवाड्यात 8 जणांचा मृत्यू झाला, अनेक जनावरे दगावली, सुमारे 62 हजार हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले, सरकारने पंचनाम्यांच्या नावाने आदेश दिले पण संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी पंचनामे करण्यास नकार दिला, काही ठिकाणी पंचनामे करत आहेत मात्र तलाठी किंवा कोणताही कर्मचारी त्यावर सह्या करायला तयार नाही. त्यामुळे पंचनाम्यांच्या नावाने वेळ काढण्यापेक्षा मंडळनिहाय रँडम सर्व्हे करून ते ग्राहय धरून तातडीची मदत जाहीर करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी केली आहे.
विधानसभा अधिनियम 57 अन्वये या गंभीर प्रश्नावर चर्चा करण्यासाठी प्रश्नोत्तराचा तास स्थगित करण्याची मागणी आ. धनंजय मुंडे यांच्यासह विरोधीपक्ष नेते अजितदादा पवार, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, सुनील केदार आदींनी केली होती.
गहू, ज्वारी, हरभरा इत्यादी काढणीला आलेली पिके या अवकाळीने जमीनदोस्त झालीत, टरबूज, खरबूज, केळी, द्राक्ष जाग्यावर सडत आहेत, आंबे गळून पडलेत, अस्मानी कहराच्या अवकृपेने शेतकऱ्यांवर अक्षरशः आभाळ फाटलं आहे, असेही धनंजय मुंडे यावेळी बोलताना म्हणाले.
बीड जिल्ह्यात मागील खरीप हंगामातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या अनुदानापोटी राज्य शासनाने 410 कोटी रुपये देण्याचे जाहीर केले होते, मात्र या घोषणेला चार महिने उलटूनही शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप एक रुपयाही आला नाही, अशी खंत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.
संपामुळे पंचनामे करण्यास होत असलेला उशीर व त्यामुळे झालेल्या नुकसानीत आढळणारी संभाव्य तफावत लक्षात घेत ऐन पाडव्याच्या तोंडावर सरकारने शेतकऱ्यांप्रति संवेदनशीलता दाखवावी व रँडम सर्व्हे ग्राहय धरून तातडीने मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली.
यावर सरकार पक्षाच्या वतीने महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पंचनामे गतीने करण्याबाबत उत्तर दिले, परंतु यावर विरोधी पक्षांचे समाधान न झाल्याने विरोधीपक्ष नेते अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात विरोधी पक्षाच्या सदस्यांनी शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत सरकार विरोधी घोषणा देत सभात्याग केला!