मुंबई |
अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल केल्याप्रकरणी अखेर बुकी अनिल जयसिंघानिया याला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने जयसिंघानिया याला अटक केली आहे. त्याला गुजरातमधून ताब्यात घेण्यात आले आहे.
जयसिंघानिया याला अटक केल्याने आता या प्रकरणातील अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. जयसिंघानिया यांची मुलगी अनिक्षा हिला आधीच पोलिसांनी अटक केलेली आहे. त्यानंतरची ही दुसरी मोठी कारवाई करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
एका केसमध्ये मदत करण्यासाठी डिझायनर अनिक्षा जयसिंघानी या तरुणीने अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केला. शिवाय त्यांना धमकी देखील देण्यात आली अशी तक्रार अमृता फडणवीस यांनी मुंबईतील मलबार हिल पोलीस स्टेशनमध्ये 20 फेब्रुवारी रोजी तक्रार दिली होती.
या तक्रारीनंतर अनिक्षाविरोधात गुन्हा दाखल झाला. अनिक्षा ही गेल्या 16 महिन्यांहून अधिक काळ अमृता फडणवीस यांच्या संपर्कात होती आणि तिने अमृता यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. एका गुन्ह्यात मदत करण्याची मागणी करत 1 कोटी रुपयांच्या लाचेची ऑफर अमृता फडणवीस यांना अनिक्षा आणि तिच्या वडिलांनी दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
कोण आहे अनिल जयसिंघानी?
अनिल जयसिंघांनी हा एक बुकी असल्याचा आरोप आहे. त्याचावर 15 गुन्हे दाखल आहेत. तसेच 7 वर्षांपासून तो फरार आहे. सगळ्या राज्यातले पोलीस म्हणजे महाराष्ट्र, गुजरात, गोवा, मध्यप्रदेश, आसाम हे पोलीस त्याचा मागावर होते. त्याचा घरावर ईडीने 2015 साली धाड टाकली होती. लोकांचे पैसे उकळण्याचे तसेच त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करणे असे देखिल त्याच्यावर आरोप आहेत.