मुंबई |
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा आहे. आज अधिवेशनात अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या मागणीवरुन विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. टोपलीत द्राक्ष आणि कांदे घेऊन अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी विरोधकांनी केली. या आंदोलनात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, ठाकरे गटाचे आमदार तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे व काँग्रेसचे आमदारही सहभागी झाले होते.
कांद्याला भाव मिळालाच पाहीजे, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या अन्यथा खुर्च्या खाली करा, अशा घोषणा विरोधकांनी दिल्या., दुसरीकडे, जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज सातवा दिवस आहे. या मुद्द्यावरुनही अधिवेशनात विरोधक सरकारला धारेवर धरण्याची शक्यता आहे.,अवकाळी पाऊस, सरकारी कर्मचाऱ्यांचा संप केवळ या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी स्थगन विधानसभेत स्थगन प्रस्ताव दाखल केला. मात्र, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा स्थगन प्रस्ताव फेटाळून लावला आहे.
95 टक्के सरकारी कर्मचाऱ्यांकडे हरामाची कमाई आहे, असे वादग्रस्त वक्तव्य शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केले होते. त्यावरुन आज अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवारांनी यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत संजय गायकवाड यांना चांगलेच सुनावले. कर्मचारी नाऊमेद झाले तर गारपिटीग्रस्तांना मदत होणार कशी?, राज्य चालणार कसे?, असे सवाल अजित पवारांनी केले. अवकाळी पाऊस, शेतीचे नुकसान, सरकारी कर्मचाऱ्यांचा संप याबाबत विरोधकांनी सादर केलेला स्थगन प्रस्ताव नाकारल्याने विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. सरकारला अवकाळी पाऊस, शेतकरी, सरकारी कर्मचाऱ्यांचा संप याबाबत गांभीर्य आहे की नाही?, असा सवाल अजित पवारांनी केला. त्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला.
ऐवढे असंवेदनशील सरकार राज्याने आत्तापर्यंत पाहिले नाही. गारपिटीच्या तडाख्याने त्रस्त असलेल्या शेतकऱ्याच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याचे सोडून हे सरकार शेतकऱ्याच्या जातीला समूळ नष्ट करण्याच्या मार्गावर असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे.