खेड (रत्नागिरी) |
मी त्यांना उत्तर द्यायला आलेलो नाही. उत्तर तर आरोप आणि टीकेला द्यायचं असतं. परंतु तोच तोच थयथयाट, तीच आदळआपट याला काय उत्तर द्यायचं? मुंबईत देखील गेली सहा महिने असाच थयथयाट सुरु आहे. तेच आरोप, तेच टोमणे, तेच रडगाणं…. फक्त जागा बदलतायेत. काही दिवसांपूर्वी या मैदानात आपटीबार येऊन गेला, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवली.
रामदास कदम यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच खेडच्या गोळीबार मैदानात काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांची सभा झाली होती. त्या सभेला उत्तर देण्यासाठी आमदार योगेश कदम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज सभा आयोजित केली होती. याच सभेला संबोधित करताना एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. हिंदुत्वाचा विचार सोडून काँग्रेस राष्ट्रवादीच्या घशात शिवसेना पक्ष घातला. आपल्याच नेत्यांच्या राजकीय कारकीर्द उद्धव ठाकरेंनी संपविण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोप या सभेतून एकनाथ शिंदे यांनी केला. त्याचवेळी योगेश कदम यांच्यामागे मी मुख्यमंत्री म्हणून ठामपणे उभा आहे, असा मेसेजही मुख्यमंत्र्यांनी दिला.
सत्तेसाठी जो हिंदुत्व सोडतो, त्याच्याबद्दल बोलायची गरज नाही. गद्दार-खोके याच्याशिवाय तुमच्याकडे बोलण्यासाठी शब्द नाहीयेत. खरी गद्दारी तर २०१९ ला झाली. भाजपसोबत लढून तुम्ही मविआ स्थापन केली. काँग्रेस राष्ट्रवादीच्या तावडीतून आम्ही धनुष्यबाण सोडवला. मी मुख्यमंत्री होईल, याची मला कल्पना नव्हती. पण बाळासाहेबांच्या विचारांसाठी मोदी-शाहांनी मला मुख्यमंत्री केलं. मी फिरणारा मुख्यमंत्री आहे, घरात बसून राहणारा मुख्यमंत्री नाही, असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
माझ्या संघर्षावेळी ५० आमदार आणि १३ खासदारांनी मला साथ दिली. तुमची भूमिका चुकतीये, असं सांगायला काही आमदार त्यांच्याकडे गेले. त्यांना म्हणाले, तुम्हाला जायचं तर तुम्हीही जा… अशी संघटना कशी वाढेल? मला त्यांना सांगायचंय, दरवाजा उघडाच ठेवा, सगळे जातील. तुम्ही हम दो हमारे दो एवढेच राहाल. मग तुमचं कुटुंब आणि तुमची जबाबदारी एवढंच काम… अशी टोलेबाजीही एकनाथ शिंदे यांनी केली.