कोल्हापूर |
“काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षांनी उद्धव ठाकरे यांना फसविले आहे. काँग्रेस राष्ट्रवादीसोबतची आघाडी उद्धव ठाकरे यांनी तोडावी, आजही आम्ही त्यांच्यासोबत जायला तयार आहे,” अशी भूमिका कोल्हापूरचे पालकमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी रविवारी कोल्हापूरात मांडली.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने श्री अंबाबाई मंदिराच्या कामांना सुरुवात केली आहे. याची पाहणी करण्यासाठी केसरकर कोल्हापूरात आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका मांडली. “आम्ही जनतेच्या प्रश्नावर आवाज उठविला म्हणून त्यांनी आमदार केले आहे. आज जनता आमच्यासोबत आहे. आम्हाला विकतच जायचे असते तर अडीच वर्षात केव्हाही गेलो असतो. उद्धव यांना आम्ही फसवलेले नाही. त्यांनी स्वत:च आम्हाला निघून जाण्यास सांगितले आहे. ही बाजू जनतेसमोर कधीतरी मांडली पाहिजे. दिल्लीत जेव्हा उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले तेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जात हिंदुत्वाचा विचार सोडल्याबद्दल चूक झाल्याचे त्यांनी कबुल केले होते. महाराष्ट्रात गेल्या गेल्या ती दुरुस्त करु असा शब्द दिला होता. तो त्यांनी मोडला. त्यामुळे त्यांनीच जनतेची फसवणुक केली. उध्दव यांना काँग्रेस-राष्ट्रवादीने फसवले, त्याचा दोष त्यांनी आमच्यावर काढला,” असे केसरकर म्हणाले.
आदित्यना लहानपणापासून खोक्यात खेळायची सवय
“कोणाला खोके-खोके म्हणता, खोक्याबरोबर खेळायची आदित्य ठाकरेंना लहानपणापासून सवय असेल, आम्हाला नाही. जनता आमच्या सोबत आहे, म्हणून आम्ही आमदार आहोत,” असे दीपक केसरकर म्हणाले. ठाकरे मुख्यमंत्री असताना कोकणाचा निधी अर्थमंत्री अजित पवार यांनी २५ कोटींपर्यंत घटवला, तेव्हा आदित्य कुचेष्टेने हसत होते. याचे व्हिडिओ उपलब्ध आहेत. त्यांची कोकणाबद्दलची आस्था सर्वांसमोर आली पाहिजे, असेही ते म्हणाले.
आठ महिन्यात मुख्यमंत्र्यांनी कोकणासाठी दिले भरघोस
“ज्या अहवालाकडे ठाकरे यांनी कुचेष्टेने पाहिले, त्याच अहवालावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साडे तेराशे कोटी कोकणाला दिले. दोनशे कोटी रुपये काजू महामंडळासाठी दिले. ज्या बाळासाहेबांनी कोकणातील माणसांच्या जोरावर शिवसेना उभी केली, त्या कोकणाला दिलेले ४५० कोटी अजित पवार यांनी काढून घेतले होते. २५० कोटींचा सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनचा आराखडा १५० कोटी केला, तेव्हा उद्धव ठाके का बोलले नाहीत,” असा सवाल दीपक केसरकर यांनी केला.