बारावीच्या परीक्षा संपलेल्या आहेत. आता पुढे काय? याची चर्चा घरोघरी सुरु झाली असणार. विज्ञान शाखेतून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरी डॉक्टर आणि इंजिनीअरिंग याच शाखांवर अजुनही अधिक लक्ष केंदित केले जाते.मात्र, हुशार मुलांनी आता या दोन शाखांच्या पलिकडे बघायला हवे. त्यापैकी एक क्षेत्र म्हणजे संशोधनाचे!
संधी कुठे आणि कशी? – बारावीनंतर उच्च दर्जाचे संशोधन करण्याची संधी देणारे अभ्यासक्रम नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲण्ड रिसर्च (नायसर)- भूवनेश्वर आणि डिपार्टमेन्ट ऑफ ॲटोमिक एनर्जी फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्सेस – मुंबई (यूएम-डीएई-सीइबीएस) यांनी सुरु केले आहेत. प्रवेश प्रकिया- या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नेस्ट (नॅशनल एन्ट्रन्स स्क्रीनिंग टेस्ट) घेतली जाते. यंदा ही परीक्षा २४ जून २०२३ रोजी देशभरातील १२० केंद्रांवर घेतली जाईल. या परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ मे २०२३ ही आहे. अर्ज www.nestexam.in या संकेतस्थळावर ऑनलाइन भरता येतो. अर्जाचे शुल्क खुल्या संवर्गासाठी १२ शे रुपये, अनुसूचित जाती/जमाती आणि महिला संवर्गासाठी सहाशे रुपये.
महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रे – मुंबई, पुणे, रत्नागिरी, सोलापूर, औरंगाबाद, जळगाव, नांदेड, कोल्हापूर आणि नागपूर
चाळणी परीक्षेचा अभ्यासक्रम –
या दोनही संस्थेतील पाच वर्ष कालावधीच्या इंटिग्रेटेड मास्टर ऑफ सायन्स अभ्यासक्रम गणित, भौतिकशास्त्र, रसानयनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांमध्ये करता येतो.
एकूण जागा – (NEST-नेस्ट) मार्फत नायसर- भूवनेश्वर येथील २०० जागा तर यूएम-डीएई-सीइबीएस- मुंबई येथील ५७ जागा भरल्या जातात. नायसर भूवनेश्वरची एम.एस्सी पदवी, होमी भाभा नॅशनल इंस्टिट्यूट मार्फत दिली जाते. ॲटोमिक एनर्जी विभागांतर्गत कार्यरत असणाऱ्या या संस्थेस डीम्ड टु बी युनिव्हर्सिटीचा दर्जा देण्यात आला आहे.
डीएई – सीइबीएस ही संस्था ॲटोमिक एनर्जी विभागात कार्यरत असणारी स्वायत्त संस्था असून तिचे केद्र मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस मध्ये आहे. अभ्यासक्रमासाठी मुंबई विद्यापीठानेही सहकार्य केले असून पदवी याच विद्यापीठामार्फत दिली जाते.
अर्हता – बारावी विज्ञान शाखेच्या परीक्षेत किमान ६० टक्के गुण. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि शारीरिकदृष्ट्या अपंग संवर्गातील विद्यार्थ्यांना ५५ टक्के गुण.
अशी असते प्रवेश परीक्षा – ही वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी पध्दतीची परीक्षा आहे. यामध्ये जीवशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि भौतिकशास्त्र या चार विषयांचे चार भाग (सेक्शन) असतात. प्रत्येक भागात ५० गुणांचे प्रश्न विचारले जातात. सर्वोत्कृष्ट तीन भागातील गुण अंतिम निवडीसाठी ग्राह्य धरले जात असल्याने, सर्व चारही भाग सोडवण्याचा सल्ला ही परीक्षा घेणाऱ्या संस्थेमार्फत दिला जातो. या पेपर मधील काही प्रश्नांसाठी निगेटिव्ह गुण आहेत. काही प्रश्नांमध्ये एक किंवा अधिक अचुक उत्तरे दिली जातात. ती नोंदवणे आवश्यक असते. केवळ एकच अचुक उत्तर नोंदवल्यास गुण दिले जात नाहीत. हा पेपर इंग्रजी भाषेमध्ये असतो. ही परीक्षा संगणकावरच द्यावी (ऑनलाईन) लागते.
संधी – विद्यार्थ्यांना पाचही वर्षे नामांकित राष्ट्रीय प्रयोगशाळा आणि विद्यापीठांमध्ये उन्हाळी किंवा हिवाळी संशोधन प्रकल्प राबविण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्याला दरमहा ५ हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. याशिवाय वार्षिक २० हजार रुपयांचे आर्थिक साहाय्य केले जाते. सर्वांना नामांकित खाजगी आणि शासकीय संस्थांमध्ये चांगले प्लेसमेंट असते.
संपर्क
डिपार्टमेन्ट ऑफ ॲटोमिक एनर्जी फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्सेस, हेल्थ सेन्टर बिल्डिंग, युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई, विद्यानगरी, कालीना कॅम्पस, मुंबई- ४०००९८,
दूरध्वनी – ०२२-२६५२४९८३,
फॅक्स-२६५२४९८२,
संकेतस्थळ www.cbs.ac.in,
ईमेल- [email protected]
इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स कॅम्पस, सचिवालय मार्ग, पोस्ट ऑफिस, सैनिक स्कूल भुवनेश्वर, ओरिसा -७५१००५,
दूरध्वनी – ०६७४-२३०४०००,
फॅक्स-२३०२४३६,
संकेतस्थळ -niser.ac.in ,
ईमेल- [email protected]
-सुरेश वांदिले
[email protected]