मुंबई |
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आता राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. परवा अजित पवारांवर अंत्यसंस्कार केले गेले. त्यानंतर आता बारामती आणि मुंबई यांच्यातील अंतर कमी झालं असून अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे.मात्र, दुसरीकडं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चिन्हं धुसर होऊ लागली आहेत. बारामतीत काल रात्री मोठ्या हालचाली पहायला मिळाल्या. त्यानंतर आता राजकारणातील चित्र स्पष्ट होऊ लागलं आहे.
सुनेत्रा पवार मुंबईला रवाना
दोन्ही राष्ट्रवादीच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत चर्चा करण्यासाठी शरद पवार यांच्या बारामती येथील निवासस्थानी शुक्रवारी रात्री उशिरा पवार कुटुंबाची एकत्रित बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी शरद पवारच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्यमंत्रीपदावर नाव फिक्स होईल, अशी शक्यता होती. मात्र, अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, पुत्र पार्थ पवार आणि जय पवार हे मुंबईला रवाना झाले. तिघंही शरद पवारांसोबतच्या बैठकीला हजर राहिले नाहीत.
बुधवारी विमान अपघातात अजित पवार यांचे निधन होण्यापूर्वी अजित पवार यांनी विलीनीकरणाची इच्छा व्यक्त केली होती. अजित पवार यांनी वारंवार जाहीर भाषणातून तसे संकेत देखील दिले होते. याबाबत पवार कुटुंबीय एकत्र चर्चा करणार होते. मात्र, पवार कुटुंबीयांची एकत्रित बैठक झाली नाही. सूत्रांनी सांगितलं की, राज्य मंत्रिमंडळातील उपमुख्यमंत्रीपद स्वीकारताना शरद पवार किंवा त्यांच्यापैकी कोणाशीही सल्लामसलत न केल्याबद्दल कुटुंबातील सदस्य सुनेत्रा पवार यांच्यावर नाराज आहेत.
आमची कोणतीही चर्चा नाही – शरद पवार
सुनेत्रा पवारांनी केवळ प्रतिभा पवारांना फोनवरून शपथ घेण्यासाठी मुंबईला जात असल्याच सांगितल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर आज शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत धक्कादायक खुलासा केला. सुनेत्रा पवारांसोबत आमची कोणतीही चर्चा नाही , शपथविधी आहे हे आम्हाला माहितच नाही. पटेल तटकरे त्यांच्या पक्षाचे नेते त्यांच्या पक्षानं काय करावं हा त्यांचा अधिकार असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
दादांची इच्छा होती – शरद पवार
दरम्यान, शरद पवार यांनी यावेळी मोठं वक्तव्य केलं. दोन राष्ट्रवादी एकत्र व्हाव्यात ही दादांची इच्छा होती. त्यांची ही इच्छा पूर्ण व्हावी अशी आमची इच्छा आहे, असं म्हणत शरद पवार यांनी पहिल्यांदाच दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनिकरणावर वक्तव्य केलं आहे.


