- Advertisement -
बीड |
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने अत्यंत कौशल्याने तपास चक्रे फिरवत, ताबा मिळाल्यापासून अवघ्या २४ तासांच्या आत एका अल्पवयीन पीडित मुलीचा शोध लावून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई बुलढाणा जिल्ह्यातील सोनाळा (ता. संग्रामपूर) येथे करण्यात आली.
बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर २०७/२०२५, कलम १३७(२) अन्वये दाखल असलेला एक गुन्हा तपासासाठी १५ जानेवारी २०२६ रोजी दुपारी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाकडे वर्ग करण्यात आला होता. तपासाची सूत्रे हाती घेताच पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांनी मूळ फाईलचे अवलोकन करून फिर्यादी व साक्षीदारांकडून सखोल माहिती घेतली.
तपासादरम्यान मिळालेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे, पीडित मुलगी आणि आरोपी रोशन गवई (रा. सोनाळा, जि. बुलढाणा) हे बुलढाणा जिल्ह्यात असल्याची खात्रीशीर माहिती पथकाला मिळाली. पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या आदेशाने १५ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता एएचटीयूचे पथक तातडीने बुलढाण्याकडे रवाना झाले. १६ जानेवारी रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास पथकाने संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे सापळा रचून पीडित मुलगी आणि आरोपीला ताब्यात घेतले. स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद केल्यानंतर पथक सकाळी ९ वाजेपर्यंत बीडमध्ये दाखल झाले. बीडला पोहोचल्यानंतर पीडित मुलीचे समुपदेशन करून तिला पालकांच्या स्वाधीन करण्यात आले, तर आरोपीला पुढील कारवाईसाठी बीड ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पुजा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव, पोलीस हवालदार उषा चौरे, हेमा वाघमारे, पोलीस शिपाई योगेश निर्धार, गजानन चौधरी (सर्व एएचटीयू, बीड) यांनी पार पाडली.
तपास वर्ग झाल्यापासून अवघ्या २४ तासांत आरोपीला जेरबंद केल्यामुळे बीड पोलिसांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.


