पाटोदा |
“नाथ परंपरेतील महान संत वामनभाऊ महाराज यांनी समाजाला अध्यात्म, सदाचार आणि एकोप्याचा मार्ग दाखवला. त्यांचे विचार काळाच्या ओघात अधिक सुसंगत झाले असून, त्यांचे कीर्तन, नामस्मरण आणि उपदेश पिढ्यान्पिढ्या समाजाला मार्गदर्शन करत राहतील,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
संत वामनभाऊ महाराजांच्या ५० व्या सुवर्णमहोत्सवी पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, गडाचे महंत विठ्ठल महाराज, आमदार धनंजय मुंडे, सुरेश धस, मोनिका राजळे, माजी आमदार जयदत्त क्षीरसागर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
‘मी मुख्यमंत्री म्हणून नव्हे, तर भक्त म्हणून आलोय’
आपल्या भाषणात मुख्यमंत्री म्हणाले की, “विठ्ठल महाराजांनी दिलेले हे निमंत्रण एका मुख्यमंत्र्याला नसून संत वामनभाऊंच्या एका भक्ताला आणि गहिनीनाथ गडाच्या सेवकाला दिलेले आहे. याच भावनेतून मी येथे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे.” वामनभाऊ महाराजांच्या अलौकिक कार्याचा गौरव करताना त्यांनी सांगितले की, महाराजांच्या उपदेशामुळे अनेक गुन्हेगार प्रवृत्तीची माणसेही सन्मार्गाला लागली, ही त्यांच्या शब्दांची मोठी किमया होती.
- गहिनीनाथ गडाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध
- गडाच्या विकासाबाबत माहिती देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी महत्त्वाच्या घोषणा केल्या:
- विकासकामे: गहिनीनाथ गडाच्या विकासासाठी शासनाच्या योजनेअंतर्गत सुरू असलेली कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जातील.
- पंढरपूर येथे जागा: भाविकांच्या सुविधेसाठी पंढरपूर येथे आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
- पालखी मार्ग: पालखी मार्गाच्या विकासाचे काम लवकरच हाती घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
‘माणसाला माणूस बनवण्याचे संस्कार’: पंकजा मुंडे
यावेळी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनीही आपले विचार व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, “संत वामनभाऊंनी अत्यंत कठीण काळात समाजाला ‘माणसाला माणूस बनवण्याचे’ संस्कार दिले. सत्य, एकोपा आणि सेवाभावाचे हे संस्कार आजही कष्टकरी आणि वंचित समाजाच्या मनात जिवंत आहेत.” मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून गडाच्या विकासाला जे भव्य स्वरूप मिळत आहे, ते भाविकांच्या श्रद्धेला साजेसे असल्याचेही त्यांनी नमूद केले.


