बीड | प्रतिनिधी
पवित्र नात्याला काळिमा फासणाऱ्या एका घटनेत पोटच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम पित्याला बीडच्या विशेष सत्र न्यायालयाने सात वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. शिरूर कासार पोलिसांनी या संवेदनशील प्रकरणात केलेला शिस्तबद्ध तपास आणि सादर केलेले भक्कम पुरावे या निकालात अत्यंत कळीचे ठरले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शिरूर कासार पोलीस स्टेशन हद्दीत १६ ऑगस्ट २०२४ रोजी ही धक्कादायक घटना उघडकीस आली होती. एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच वडिलांनी वारंवार शारीरिक मारहाण आणि लैंगिक अत्याचार केला होता. पीडितेने अत्यंत धैर्याने १८ ऑगस्ट २०२४ रोजी पोलीस स्टेशन गाठून या नराधम बापाविरुद्ध तक्रार दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत आरोपीला बेड्या ठोकल्या होत्या.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पीडितेचा विश्वासार्ह जबाब नोंदवणे, साक्षीदारांची साक्ष आणि तांत्रिक पुराव्यांची योग्य मांडणी करून अत्यंत कमी वेळात न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. पोलिसांच्या या मानवी दृष्टिकोनातून केलेल्या तपासाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सदर खटल्याची सुनावणी बीड येथील विशेष सत्र न्यायालयाचे न्यायाधीश मा. एस.एस. घोरपडे यांच्यासमोर झाली. सरकारी पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता श्री. ए. बी. तिडके यांनी मांडलेला जोरदार युक्तिवाद आणि पोलिसांनी सादर केलेले सबळ पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला POCSO कलम १०: ७ वर्षे सक्तमजुरी. POCSO कलम १२: ३ वर्षे सक्तमजुरी. BNS कलम ११५ (मारहाण): ६ महिने शिक्षा. अशी शिक्षा सुनावली: यासोबतच आर्थिक दंड आणि पीडितेला नुकसान भरपाई देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
तपासी पथकाचे यश
हा खटला यशस्वीरित्या तडीस नेण्यासाठी श्रेणी पोलीस उपनिरीक्षक गोविंद सानप यांनी पैरवी अधिकारी म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. शिरूर कासार पोलिसांनी दाखवलेली ही तत्परता आणि शिस्तबद्ध तपासामुळे पीडितेला न्याय मिळाला असून, गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा वचक निर्माण झाला आहे.


