- Advertisement -
पाटोदा |
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला बीडमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. शेतातील तोडलेल्या झाडांच्या वाहतुकीसाठी एक हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या पाटोदा वन परिक्षेत्र कार्यालयातील वनरक्षकाला बीडमधून अटक करण्यात आली आहे. दादासाहेब तेजराव येदमल असे अटक करण्यात आलेल्या वनरक्षकाचे नाव आहे.
तक्रारदार शेतकरी आपल्या शेतातून तोडलेल्या वृक्षांची वाहतूक करत होते. ही वाहतूक सुरळीत होऊ देण्यासाठी वनरक्षक दादासाहेब येदमल याने प्रत्येक खेपेसाठी १ हजार रुपये याप्रमाणे लाचेची मागणी केली होती. लाच स्वीकारताना आपण पकडले जाऊ नये, यासाठी येदमल याने एक शक्कल लढवली. त्याने ही रक्कम स्वतः न स्वीकारता, बीड-रायमोहा फाट्यावरील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या दिगांबर चौधरी याच्याकडे देण्यास सांगितले.
तक्रारदाराने लाचेची रक्कम हॉटेल कामगाराकडे सुपुर्द केल्यानंतर याची माहिती येदमल याला दिली. मात्र, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आधीच या प्रकरणाचा सापळा रचला होता. हॉटेल कामगाराने पैसे स्वीकारल्याचे निष्पन्न होताच, एसीबीच्या पथकाने थेट बीड शहरातील संत भगवानबाबा चौक परिसरातील येदमल याच्या घरातून त्याला ताब्यात घेतले.
ही यशस्वी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सोपान चिट्टमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल खरसाडे, प्रदीप सुरवसे, अंबादास पुरी, मच्छिंद्र बीडकर यांनी केली
वर्षभराच्या शेवटच्या दिवशी वनविभागाच्या कर्मचाऱ्यावर झालेली ही कारवाई शासकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली असून, यामुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.


