बीड | प्रतिनिधी
बीड जिल्ह्यासाठी सरते वर्ष २०२५ हे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत आव्हानात्मक होते. मात्र, जिल्हा विशेष शाखेने (DSB) वेळोवेळी प्राप्त केलेली गोपनीय माहिती आणि चोख बंदोबस्ताचे नियोजन यामुळे जिल्ह्यात घडलेल्या मोठ्या घडामोडींनंतरही शांतता प्रस्थापित करण्यात यश आले आहे. राजकीय आंदोलने, व्हीआयपी दौरे आणि सण-उत्सवांच्या काळात पोलिसांनी बजावलेली भूमिका जिल्ह्याच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाची ठरली आहे.
मोठ्या घटनांमध्ये वेळीच हस्तक्षेप
जानेवारी २०२५ मधील संतोष देशमुख हत्याकांड, एप्रिलमधील खडकत (ता. आष्टी) येथील जातीय तणाव, गेवराई तालुक्यातील अर्धमसला येथील मशिदीतील स्फोट आणि महादेव मुंडे हत्याकांड यांसारख्या संवेदनशील घटनांनी जिल्हा हादरला होता. मात्र, खडकत येथील किरकोळ लाठीमार वगळता, पोलिसांनी इतर सर्व ठिकाणी अत्यंत संयमाने परिस्थिती हाताळली. शेतकरी ऊस आंदोलन आणि महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातही पोलिसांनी जनक्षोभ शांत ठेवण्यात यश मिळवले.
राजकीय हालचाली आणि २७६ आंदोलने
२०२५ मध्ये जिल्ह्याने राजकीय धामधूम अनुभवली. मुख्यमंत्री (४ वेळा), उपमुख्यमंत्री (९ वेळा) आणि केंद्रीय मंत्र्यांच्या दौऱ्यावेळी जिल्हा विशेष शाखेने पुरविलेल्या अचूक माहितीमुळे एकही अनुचित प्रकार घडला नाही. विशेष म्हणजे, वर्षभरात जिल्ह्यात धरणे, मोर्चे आणि आत्मदहनासारखी एकूण २७६ आंदोलने झाली, परंतु कोठेही कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही.
३७२ शस्त्र परवाने रद्द
जिल्हा विशेष शाखेने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या शस्त्र परवानाधारकांविरुद्ध मोठी मोहीम राबवली. पाठवलेल्या ३७३ प्रस्तावांपैकी जिल्हाधिकाऱ्यांनी ३७२ शस्त्र परवाने रद्द केले आहेत. तसेच, नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर १३६८ जणांवर प्रतिबंधक कारवाई, ८० जणांना हद्दपार आणि ५ जणांवर एम.पी.डी.ए. अंतर्गत कारवाई करण्यात आली.
अनाधिकृत पुतळ्यांचा प्रश्न
वर्षभरात जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एकूण ६९ अनाधिकृत पुतळे उभारण्यात आले. या प्रकरणी ६७ गुन्हे दाखल झाले असून १६४ जणांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे.
आकडेवारीवर एक नजर:
पासपोर्ट पडताळणी: १२,२७१ अर्ज निकाली.
चारित्र्य पडताळणी (ऑनलाईन/ऑफलाईन): सुमारे ४८,००० हून अधिक अर्ज निकाली.
परीक्षा बंदोबस्त: ७३ विविध परीक्षांसाठी सुरक्षा पुरवली.
निवडणूक बंदोबस्त: ६ ठिकाणच्या न.प. निवडणुका शांततेत पार पाडल्या.
बीड जिल्हा विशेष शाखेच्या या अष्टपैलू कामगिरीमुळे सण-उत्सव, निवडणुका आणि राजकीय दौरे कोणत्याही अडथळ्याविना पार पडले असून, जिल्ह्याच्या सुरक्षिततेत या शाखेचा कणा महत्त्वाचा ठरला आहे.


