पेठ बीड पोलिसांनी ४.४० लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत; आरोपींवर संघटित गुन्हेगारीचे कलम लागू
बीड |
शहरातील नवीन मोढा परिसरात तिरुमला हेअर ऑईल कंपनीचे शटर कापून लाखांचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या टोळीचा पेठ बीड पोलिसांनी अवघ्या दोन तासांत छडा लावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ५ आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून ४ लाख ४० हजार रुपये किमतीच्या इलेक्ट्रिक मोटर्स जप्त केल्या आहेत. धक्कादायक म्हणजे, हे सर्व आरोपी सराईत गुन्हेगार असल्याने त्यांच्यावर आता भारतीय न्याय संहितेचे नवीन संघटित गुन्हेगारीचे कलम ११२ देखील लावण्यात आले आहे.
फिर्यादी दत्ता गंगाधर जगदाळे (रा. साखरे बोरगाव) यांची नवीन मोढा परिसरात ‘तिरुमला हेअर ऑईल’ नावाची कंपनी आहे. २ डिसेंबरच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी कंपनीचे शटर कापून आत प्रवेश केला. चोरट्यांनी कंपनीतील: ५० HP क्षमतेच्या ३ मोटर्स (किंमत ४.५० लाख), २५ HP क्षमतेच्या २ मोटर्स (किंमत १.४० लाख) असा एकूण ५,९०,००० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. ३ डिसेंबर रोजी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दोन तासांत आरोपींच्या मुसक्या आवळल्या
गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपासाची चक्रे फिरवली. अवघ्या दोन तासांत पोलिसांनी किशोर भगवान मस्के (३६) आणि मयूर गोरख चांदणे (२१) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १.४० लाखांच्या दोन मोटर्स जप्त करण्यात आल्या.
अधिक तपासाअंती, या गुन्ह्यात सामील असलेले इतर तीन आरोपी अविनाश कल्याण धुरंधरे (३५), गोपी ऊर्फ बाळा एकनाथ चांदणे (३०) आणि विपुल उत्तम गायकवाड (४०) यांनाही अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ३ लाखांच्या दोन मोटारी जप्त करण्यात आल्या. या कारवाईत आतापर्यंत ४,४०,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
सराईत गुन्हेगारांवर ‘मोक्का’ धर्तीवर कारवाई
या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार भीमा लक्ष्मण मस्के हा अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अटक केलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. ते संघटितपणे गुन्हे करत असल्याचे निष्पन्न झाल्याने, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११२ (संघटित गुन्हेगारी) नुसार वाढीव कारवाई करण्यात आली आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पुजा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मारुती खेडकर, सपोनि नित्यानंद उबाळे, पोउपनि मन्सूर शहा व त्यांच्या पथकाने केली.


