बीड |
लाडेवडगाव येथील ८० वर्षीय वृद्ध महिलेला पत्राच्या शेडमध्ये एकटे गाठून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने बळजबरीने चोरणाऱ्या टोळीचा बीड स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावला आहे. या कारवाईत मुख्य आरोपीला अटक करून त्याच्याकडून लुटलेले ९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
लाडेवडगाव येथील रहिवासी मालनबाई तुकाराम लाड या रात्री आपल्या पत्राच्या शेडमध्ये एकट्या झोपलेल्या असताना चार अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला. या चोरट्यांनी वृद्ध महिलेला धमकावून त्यांच्या कानातील सोन्याचे दागिने बळजबरीने हिसकावून नेले होते. या खळबळजनक घटनेप्रकरणी युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (६) अन्वये १८ जून २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने आणि त्यांचे पथक या गुन्ह्याचा समांतर तपास करत होते. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, श्याम अजिनाथ शिंदे (वय २३ अंदाजे, रा. मांडवा, ता. वाशी, जि. धाराशिव) याने आपल्या साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. २० डिसेंबर २०२५ रोजी आरोपी केज बसस्थानक परिसरात येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याला तातडीने ताब्यात घेतले.
पोलिसी खाक्या दाखवताच त्याने विशाल अजिनाथ शिंदे, अमोल नाना शिंदे आणि रमेश नाना काळे (सर्व रा. जिल्हा धाराशिव) यांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीकडून चोरीला गेलेले दागिने जप्त केले असून तो सध्या कोठडीत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत आणि अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मच्छिद्र शेंडगे, महेश विघ्ने आणि पथकाने केली आहे.


