पाटोदा |
पाटोदा तालुक्यातील गंडाळवाडी येथे लग्नाच्या नावाखाली एका तरुणाची ६ लाख रुपयांना फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी अंमळनेर पोलीस ठाण्यात नवरीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
गंडाळवाडी येथील ३४ वर्षीय संजय शामराव पवार हे गेल्या काही काळापासून विवाहासाठी मुलीच्या शोधात होते. हीच संधी साधून मध्यस्थ दत्ता पवार (रा. सुपा) आणि पठाण (रा. चोभा निमगाव) यांनी संजय यांना एका मुलीचे स्थळ सुचवले. लग्नाच्या बोलणीसाठी पंढरपूर येथे मुलगी पाहण्याचा कार्यक्रम ठरला. यावेळी मुलीची कथित मावशी जयश्री शिंदे आणि एका महिला एजंटने लग्नासाठी ४ लाख रुपयांची रोकड मागितली. लग्नाच्या आशेपोटी संजय यांनी ही रक्कम दिली आणि त्यांच्या सांगण्यावरून सुमारे २ लाख रुपयांचे सोन्याचे दागिनेही खरेदी केले.
पाचव्या दिवशी नवरी पसार
पंढरपूर येथे नोटरी पद्धतीने आणि त्यानंतर गावी धार्मिक विधी करून संजय यांचा विवाह रुपाली बाळू दिशागंज (रा. लाडगाव, वैजापूर) हिच्याशी पार पडला. लग्नानंतर पाच दिवस रुपाली सासरी व्यवस्थित राहिली. मात्र, १५ डिसेंबरच्या रात्री घरातील सर्वांची नजर चुकून ती ४ लाखांची रोकड आणि २ लाखांचे दागिने घेऊन पसार झाली.
नवरी बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच संजय यांनी मध्यस्थांशी संपर्क साधला. मात्र, मध्यस्थांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. कहर म्हणजे, मुलीची मावशी जयश्री शिंदे आणि एजंट महिलेने संजय यांनाच धमकावले. “मुलगी आता परत येणार नाही, पुन्हा फोन केला तर तुझ्यावर आणि तुझ्या मित्रांवर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करू,” अशी धमकी त्यांनी दिली. या धमकीनंतर आपली संघटित टोळीकडून फसवणूक झाल्याची खात्री संजय यांना पटली.
संजय पवार यांच्या तक्रारीवरून अंमळनेर पोलिसांनी ५ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. यामध्ये दत्ता पंढरीनाथ पवार (रा. सुपा, पाटोदा) – पठाण (रा. चोभा निमगाव, आष्टी) – रुपाली बाळू दिशागंज (रा. लाडगाव) – नवरी जयश्री रवी शिंदे (रा. पंढरपूर) – कथित मावशी आणि अनोळखी महिला एजंट या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक भार्गव सपकाळ करत आहेत. लग्नाळू तरुणांनी अशा मध्यस्थांपासून सावध राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.


