महापालिका निवडणुकांची घोषणा करण्यात आल्यानंतर आता राज्यामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीचा सुद्धा धुरळा उडण्याची शक्यता आहे. नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकीचा निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर झाल्यानंतर दोन ते तीन दिवसांमध्ये राज्यातील १४ जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुद्धा घोषणा राज्य निवडणूक आयोगाकडून होण्याची शक्यता आहे. राज्यातील १४ जिल्हा परिषदांची निवडणूक २३ ते ३० डिसेंबरच्या दरम्यान जाहीर होण्याची शक्यता आहे.
कोणत्या जिल्हा परिषदांची निवडणूक होऊ शकते?
पहिल्या टप्प्यात कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजी नगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जालना, बीड, परभणी, धाराशिव आणि अहिल्यानगर या 14 जिल्हा परिषदांची निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या जिल्ह्यांमध्ये प्रभाग आरक्षणाची स्थिती कायदेशीर असल्याने निवडणूक घेण्यामध्ये कोणतीही अडचण नाही. त्यामुळे पहिल्या टप्प्यांमध्ये या जिल्हा परिषदेमध्ये निवडणूक होऊ शकते आणि दुसरीकडे प्रभाग आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या 18 इतर जिल्हा परिषदेमध्ये निवडणुकीची अजूनही संभ्रमावस्था कायम आह. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात 18 डिसेंबर रोजी होणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष असेल.
सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी 2026 पर्यंत राज्यातील सर्व स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार आयोगासमोर कोणत्याही परिस्थितीत निवडणूक घेण्याचे आव्हान आहे. अशा स्थितीत सर्वच निवडणुका एकाच वेळी घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागू शकते. अशा स्थितीत जिल्हा परिषद निवडणुकांसाठी मुदतवाढ घेतली जाऊ शकते. त्यामुळे राज्य निवडणूक आयोग जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दोन टप्प्यात निवडणुका घेऊन निवडणुका पार पाडणार की मुदतवाढ घेऊन एकाच टप्प्यांमध्ये सर्व झेडपी निवडणुका घेणार याकडे सुद्धा लक्ष असेल. ज्या जिल्हा परिषदांमध्ये आरक्षण मर्यादा ओलांडली गेली आहेत, त्या संदर्भातील वर्धा जिल्ह्यातील दाखल केलेल्या याचिकेवर 18 डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालय अंतिम निर्णय देणार आहे. य निर्णयावर जिल्हा परिषद निवडणुकीचे भवितव्य अवलंबून असेल.
महानगरपालिका क्षेत्रात आचारसंहिता
राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान; तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांसह एकूण 2 हजार 869 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या सर्व महानगरपालिकांच्या क्षेत्रांत आचारसंहिता लागू झाली आहे. सर्व महानगरपालिकांची निवडणूक प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निकालाच्या आधीन राहून राबविण्यात येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीची अधिसूचना 16 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध होईल. उर्वरित सर्व 28 महानगरपालिकांची अधिसूचना 18 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. अधिसूचना प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया संबंधित महानगरपालिका आयुक्त आपापल्या स्तरावर पार पाडतील. सर्व महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल.
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून संबंधित महानगरपालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात ही आचारसंहिता लागू असली तरी अन्य ठिकाणीदेखील महानगरपालिकेच्या मतदारांवर प्रभाव पाडणारी घोषणा किंवा कृती करता येणार नाही. आचारसंहिता लागू झाल्यामुळे शासनाला महानगरपालिका कार्यक्षेत्राशी संबंधित धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत. नैसर्गिक आपत्तीबाबत करावयाच्या उपाययोजना किंवा मदतीसंदर्भात आचारसंहितेची आडकाठी असणार नाही.


