इतर मागास प्रवर्गाच्या आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा न ओलांडलेल्या राज्यातील १४ जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समितीच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनीच तसे संकेत दिले आहेत.
पहिल्या टप्प्यात कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजी नगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जालना, बीड, परभणी, धाराशिव आणि अहिल्यानगर या 14 जिल्हा परिषदांची निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या जिल्ह्यांमध्ये प्रभाग आरक्षणाची स्थिती कायदेशीर असल्याने निवडणूक घेण्यामध्ये कोणतीही अडचण नाही. त्यामुळे पहिल्या टप्प्यांमध्ये या जिल्हा परिषदेमध्ये निवडणूक होऊ शकते आणि दुसरीकडे प्रभाग आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या 18 इतर जिल्हा परिषदेमध्ये निवडणुकीची अजूनही संभ्रमावस्था कायम आह. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात 18 डिसेंबर रोजी होणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष असेल.
सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत; पण त्याचवेळी जिल्हा परिषद, पंचायत समितीत ओबीसी प्रवर्गाची आरक्षण मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा जास्त झाल्याचे कारण देत काही जिल्ह्यांतून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. त्यावरील सुनावणी प्रलंबित आहे; पण आरक्षण मर्यादा न ओलांडलेल्या १४ जिल्हा परिषदांच्या निवडणुका होऊ शकतात, असे आयुक्त वाघमारे यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी मर्यादा ओलांडलेल्या १८ जिल्हा परिषदांचा कार्यक्रम पुढे जाण्याची शक्यता आहे.
राज्यात एकूण ३४ जिल्हा परिषदा आहेत. त्यापैकी भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदेची निवडणूक होणार नाही. उर्वरित ३२ पैकी १८ जिल्हा परिषदेत आरक्षण मर्यादा ओलांडली गेली आहे. आरक्षण मर्यादा ओलांडली तेथे निवडणूक न घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
याचा अर्थ उर्वरित १४ जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका घेण्यात न्यायालयाच्या आदेशाने अडचण येत नाही. त्यामुळेच आयोगाने या १४ जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचा संभाव्य कार्यक्रम तयार केला आहे. त्याची घोषणा पुढील आठवड्यात किंवा २२ डिसेंबरनंतर केव्हाही होण्याची शक्यता आहे.
राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीची घोषणा सोमवारी झाली. महापालिकांचा निकाल १६ जानेवारीला आहे. त्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी मतदान होईल. राज्यातील पालिकांचा निकाल २१ डिसेंबरला आहे, त्यानंतर रितसर कार्यक्रम जाहीर केला जाईल.


