मुंबई |
कोरोना मधून आता कुठे तरी आपण सुटलो असा विचर करत असतानाच देशात ‘एच ३ एन २’ या नव्या विषाणूचे संकट निर्माण झालं आहे. त्यातच आता महाराष्ट्रात ‘एच ३ एन २’ ची लागण झालेल्या दोन रुग्णाच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. अहमदनगर येथे २३ वर्षीय तरुणाचा तर उपराजधानी नागपूर येथे ७८ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे.
सदर तरुण हा मूळचा औरंगाबाद येथील असून तो अहमदनगरमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत होता. मागील आठवड्यात तो कोकणात फिरायला गेला होता. त्यानंतरच तो आजारी पडला होता. त्याला ताप, खोकला आणि सर्दी अशी काही लक्षणे आढळून आली होती. सर्वप्रथम त्याची कोरोना चाचणी केली त्यात त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्याची ‘एच ३ एन २’ टेस्ट केली असता त्यामध्येही त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्याच्या मृत्यूनंतर आता त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची चाचणी करण्यात येणार आहे.
नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीतील ७८ वर्षीय रुग्णावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. प्राप्त माहितीनुसार, रुग्णाला ‘क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज’ (सीओपीडी), मधुमेह, उच्चरक्तदाबासारख्या सहव्याधी होत्या. आरोग्य सेवा उपसंचालक (नागपूर सर्कल) डॉ. विनिता जैन यांनी सांगितले की, बुधवारी ‘डेथ ऑडिट’ समितीसमोर हे प्रकरण आल्यावर व त्यांनी मान्यता दिल्यावरच या मृत्यूची ‘एच३एन२’ म्हणून नोंद होईल.
या घटनेने राज्य सरकारची चिंता वाढली आहे. देशात आत्तापर्यन्त या विषाणूमुळे ३ रुग्णांचा मृत्यू झाला होता. परंतु आता या विषाणूने महाराष्ट्रातही शिरकाव केल्यामुळे पुन्हा एकदा संकटाचे ढग डोक्यावर दिसत आहेत.