मुंबई |
भाजपाच्या नेत्या आणि राज्याच्या पर्यावरण तथा पशुसंवर्धन मंंत्री पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी गौरी गर्जे (२८) यांनी शनिवारी रात्री वरळी बीडीडी येथे राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
गौरी गर्जे या परळच्या केईएम रुग्णालयात डेंटिस्ट म्हणून कार्यरत होत्या. पतीचे दुसऱ्या महिलेसोबत असलेल्या अनैतिक सबंधाची माहिती गौरीला मिळाली होती, त्यातून पतीपत्नीत होणाऱ्या कलहातून डॉक्टर गौरीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी वरळी पोलिसांनी पती, दिर आणि नणंद या तिघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉक्टर गौरी गर्जे -पालवे (२८) ही बीड जिल्ह्यातील पिंपळनेर येथे राहणारे वैद्यकीय योग शिक्षक अशोक पालवे यांची कन्या आहे. गौरीचे बीड येथील आदित्य डेंटल महाविद्यालयात बीडीएस शिक्षण पूर्ण झाले होते. मुंबईतील सेंट जॉर्ज रुगणालयात डेंटिस्ट म्हणून नोकरीला लागली होती. त्यानंतर सायन आणि तेथून केईएम मध्ये गौरी डेंटिस्ट म्हणून कामाला लागली होती.
डॉक्टर गौरीचा ७ फेब्रुवारी रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील अनंत गर्जे यांच्या सोबत बीड जिल्ह्यात विवाह सोहळा पार पडला होता. अनंत गर्जे हे भाजपाच्या नेत्या आणि राज्याच्या पर्यावरण तथा पशुसंवर्धन मंंत्री पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहाय्यक आहे. गौरी आणि अनंत गर्जे हे वरळीतील आदर्श नगर येथील ‘महाराष्ट्र मल्टी युनिट रेसिडेन्सीयल’ येथे राहण्यास होते, १ ऑक्टोबर रोजी दोघे नवीन वरळी बीडीडी वसाहत डी विंग- ३० वा मजला येथे भाडेतत्वावर राहत होते, त्याच ठिकाणी गौरीचा दिर अजय गर्जे हा राहण्यास होता.
मागील काही महिन्यांपूर्वी अनंत गर्जे याचे परस्त्री सोबत अनैतील संबंध असल्याचा संशय असल्या मुळे पती पत्नीत वाद सुरू होता, त्यात घर शिफ्टिंगच्या वेळी गौरीला जुन्या घरात पतीच्या अनैतिक सबंधाबाबत पुरावे आढळुन आले. लातूर येथील ममता रुग्णालयाचे एका महिलेचे गर्भवती असल्याचे कागदपत्रे आढळून आले, त्यात त्या महिलेचे नाव आणि पतीचे नाव म्हणून अनंत गर्जे यांचे नाव लिहलेले होते. यावरून पती पत्नीत वाद होत होता, त्यात याबाबतीत कोणाला सांगू नको सांगितले तर मी आत्महत्या करीन आणि कल सुसाईड नोट मध्ये तुझे नाव लिहीन अशी धमकी अनंत गर्जे यांनी गौरीला दिली होती असा आरोप गौरीचे वडील अशोक पालवे यांनी केला आहे. तसेच या अनैतिक संबंधाची माहिती दिर अजय आणि नणंद यांना माहीत होते, ते देखील तिचा मानसिक छळ करीत होते असा आरोप अशोक पालवे यांनी केला आहे.
शनिवारी सायंकाळी या कारणावरून गौरीने घरात कोणी नसताना राहत्या घरात गळफास लावून घेतला गळफास लावण्यापूर्वी गौरीने पती अनंत यांना मोबाईल वर फोन करून आत्महत्या करीत असल्याचे कळवले होते, अनंत हे भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्यासोबत एका राजकीय दौऱ्यावर निघाले होते, त्यांनी दौरा रद्द करून घरी धाव घेतली असता गौरीने गळफास घेतला होता. अनंत गर्जे यांनी तात्काळ तिला खाली उतरवले आणि नायर रुग्णालय येथे आणले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
याप्रकरणी वरळी पोलिसांनी गौरीचे वडील अशोक पालवे यांच्या तक्रारीवरून अनंत गर्जे दिर अजय गर्जे आणि नणंद शीतल गर्जे यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.


