मुंबई |
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी घेण्यात याव्यात असे सुप्रीम कोर्टानं आदेश दिले आहेत. त्यानुसार गेल्या पाच वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यामुळं मार्गी लागत आहेत. निवडणूक आयोगानं तीन टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा करण्यात येत आहे. सध्या नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे.
यानंतर जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची घोषणा होणार आहे. त्यानंतर महापालिकेच्याही निवडणुका जाहीर होतील.
राज्यातील ग्रामीण भागात सध्या नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची आचारसंहिता सुरू आहे. या ठिकाणी २ डिसेंबरला मतदान झाल्यानंतर लगेच ३ डिसेंबरला मतमोजणी आहे.
दरम्यान, यानंतर १८ नोव्हेंबरला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे, अशी राजकीय वर्तुळात आणि प्रशासनात चर्चा आहे.
हिवाळी अधिवेशनही यंदा आचारसंहितेतच असणार आहे. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासून सुरू होणार आहे.
दरम्यान, विधिमंडळ सचिवालयाचे कामकाज २८ नोव्हेंबरपासून नागपुरात सुरू होणार असून, प्रशासनिक तयारीला गती मिळाली आहे. ३ डिसेंबरला मतमोजणी झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल.
मात्र, १८ नोव्हेंबरला जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा झाल्यास अधिवेशन हे आचारसंहितेत जाईल. त्यामुळं सरकारला मोठ्या घोषणा करण्यावर मर्यादा असणार आहे.


