सोलापूर |
गुन्हा दाखल झाल्यावर कायद्याबाबत अनभिज्ञ लोक पोलिस अटक करतील म्हणून घाबरून जातात. पण, गुन्ह्यात आरोपीला अटक केल्यावर दोन तासांत संबंधित आरोपीला अटकेची कारणे देणे पोलिसांसाठी बंधनकारक आहे. त्या आरोपीला अटकेची कारणे समजावून सांगितल्याचे न्यायालयात सांगावे लागते. पोलिसांनी हा आदेश पाळला नाही, तर आरोपीची अटक किंवा रिमांड बेकायदा ठरेल, असे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
भारतीय न्याय संहितेनुसार अलीकडे सात वर्षांपेक्षा कमी शिक्षेच्या अनेक गुन्ह्यांत संशयित आरोपींना शक्यतो अटक केली जात नाही. संबंधितांना नोटीस बजावून पोलिस चौकशीला बोलावतात, त्यानंतरही गरज वाटली तर त्या आरोपीस अटक करून पुढील तपास पोलिस करू शकतात. दुसरीकडे, ६० वर्षांवरील आरोपीस अटक करण्यापूर्वी त्याची वैद्यकीय तपासणी केली जाते. त्यास पूर्वीचा गंभीर आजार असेल तर पोलिस शक्यतो अटक करत नाहीत.
खास करून गुन्ह्यातील मुद्देमाल, गुन्ह्यात वापरलेल्या वस्तू हस्तगत करण्यासाठी आरोपीस अटक केली जाते. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यातील पोलिस एखाद्या आरोपीस अटक करणार असतील तर त्याची माहिती स्थानिक पोलिसांना द्यावी लागते. तसेच, त्या आरोपीच्या नातेवाइकासही अटकेबद्दल माहिती देणे पोलिसांना बंधनकारक आहे. दाखल गुन्ह्यात सहभाग नसतानाही एखाद्याचे नाव आले असल्यास वकिलांमार्फत ती व्यक्ती न्यायालयात दाद मागू शकते.
सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असे…
अटकेतील आरोपीला २४ तासांत न्यायालयात हजर करावे लागते. त्यावेळी अटकेची कारणे आरोपीला समजावून सांगावी लागतात. त्याच्यावरील अपराध जामीनपात्र असल्याचेही त्याला सांगणे आवश्यक आहे. आरोपीला अटकेची कारणे दोन तासांत देणे पोलिसांना बंधनकारक आहे; अन्यथा ती अटक किंवा रिमांड बेकायदा ठरेल, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. आरोपीच्या अटकेची आवश्यकता का आहे, अटक केल्याबद्दल त्याच्या नातेवाईक किंवा जवळच्या मित्राला सांगितले आहे का, हेही पोलिसांना न्यायालयात सविस्तर सांगावे लागते.
– प्रदीपसिंग राजपूत, जिल्हा सरकारी वकील, सोलापूर
अटकेची माहिती देऊनच आरोपीला केली जाते अटक
एखाद्या गुन्ह्यात आरोपीला अटक केल्यानंतर दोन तासांत त्याच्या रिमांड किंवा अटकेची कारणे न्यायालयास कळवावी लागतात. दुसरीकडे, आरोपीच्या अटकेबाबत त्याच्या नातेवाइकास माहिती दिली जाते. सात वर्षांपेक्षा कमी शिक्षेच्या गुन्ह्यात आरोपीच्या अटकेची कारणे न्यायालयास देऊनच अटक करावी लागते. ज्या गुन्ह्यात आरोपीच्या अटकेची गरज आहे, अशा गुन्ह्यात आरोपीला अटक होते.
– विजय कबाडे, पोलिस उपायुक्त, सोलापूर शहर


