मुंबई |
ई-चलान कारवाई करताना वाहतूक पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी खाजगी मोबाईल फोनचा वापर फोटो किंवा चित्रीकरणासाठी करता येणार नाही. अशा आशयाचे आदेश अपर पोलीस महासंचालक (वाहतूक), महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या कार्यालयाने पुन्हा एकदा जारी केले आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे.
परिवहन मंत्र्यांची नाराजी आणि संघटनेची तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनात वाहतूक संघटनांसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. याच बैठकीत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. वाहतूक संघटनांच्या प्रतिनिधींनी तक्रार केली की, वाहतुकीचे नियमन करणारे पोलीस अधिकारी/अंमलदार हे त्यांचे खाजगी मोबाईल वापरून एकाच वेळी मोठ्या संख्येने वाहनांचे फोटो काढतात आणि ते सोयीनुसार ई-चलान प्रणालीमध्ये अपलोड करून चुकीचे चलान देतात.
या तक्रारीनंतर परिवहन मंत्र्यांनी या पद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) यांच्या कार्यालयाने यापूर्वीही संदर्भ क्रमांक 2 ते 4 नुसार खाजगी मोबाईलचा वापर न करण्याचे आदेश दिले होते. तरीही काही घटकांमध्ये हे नियम पाळले जात नसल्याचे निदर्शनास आले आहे.
चुकीच्या पद्धतीने चलान
अनेक पोलीस अधिकारी/अंमलदार अद्यापही स्वतःच्या खाजगी मोबाईल फोनद्वारे फोटो काढून, वास्तविक वेळ सोडून, ते सोयीनुसार ई-चलान प्रणालीमध्ये अपलोड करतात आणि चुकीच्या पद्धतीने चलान जनरेट करतात. अशा प्रकारे खाजगी मोबाईलद्वारे फोटो काढून सोयीनुसार ई-चलान करताना पोलीस अधिकारी / अंमलदार निदर्शनास आल्यास, त्यांचेविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश अपर पोलीस महासंचालक प्रविण साळुंके यांनी दिले आहेत.
हे आदेश तातडीने अंमलात आणण्यासाठी मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नवी मुंबई, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील सर्व पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक आणि महामार्ग पोलीस ठाण्यांना पत्र पाठवण्यात आले आहे.