राज्यातील लोकप्रिय योजनेपैकी एक असणारी लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेटसमोर आली आहे. या अपडेटनुसार, आता या योजनेचा फायदा घेण्यासाठी लाडक्या बहिणींना पती आणि वडिलांचे ई-केवायसी करणे बंधनकारक असणार आहे.
राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेत लाभ घेणाऱ्या महिला लाभार्थीसोबतच आता त्या महिलेचे पती किंवा वडिलांचेही वार्षिक उत्पन्न तापसण्यासाठी त्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. जर लाभार्थी महिलेच्या वडील किंवा पतीचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असेल तर संबंधित लाभार्थी महिला या योजनेसाठी अपात्र ठरणार आहे.
लाडकी बहीण योजनेसाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावा ही मुख्य अट ठेवण्यात आली आहे. सध्या या योजनेत लाभ घेणाऱ्या अनेक महिलांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे मात्र वडील किंवा पतीचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे की नाही याबाबत आता सरकारकडून चौकशी करण्यात येणार आहे. तर काही दिवसांपूर्वी या योजनेत असणाऱ्या महिलांचे उत्पन्न शोधण्यासाठी त्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले होते. तर आता सरकारने मोठा निर्णय घेत वडील किंवा पतीचे ई-केवायसी करणे देखील बंधनकारक केले आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात या योजनेची सुरुवात करण्यात आली होती. तेव्हा राज्य सरकारकडून कोणत्याही अटीशिवाय सर्व लाभार्थी महिलांना पैसे मिळत होते मात्र यानंतर राज्याच्या तिजोरीवर प्रचंड आर्थिक भार पडत असल्याने राज्य सरकारने या योजनेसाठी अनेक नवे नियम लागू केले आहे.