मुंबई |
मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावर बसलेल्या मनोज जरांगेंच्या उपोषणाला मोठे यश आले आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीन जरांगे यांची उपोषणस्थळी भेट घेत विविध मागण्या मान्य केल्या आहेत.
सरकारने हैदराबाद गॅझेटियरला मान्यता दिली असून, याचा सरकारी आदेश तत्काळ काढला जाणार असल्याचे स्पष्ट केले. तर, येत्या १५ दिवसांत सातारा गॅझेटियरला लागू करणार असल्याचे समितीने स्पष्ट केले.
मराठा उपसमितीने जरांगे पाटील यांची भेट घेतली या वेळी समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मंत्री कोकाटे, उदय सामंत, जयकुमार गोरे उपस्थित होते.
मराठा उपसमितीने कोणत्या मागण्या मान्य केल्या
१) हैदराबाद गॅझेटियरला मंत्रिमंडळ उपसमिती मान्यता देण्यास तयार.
२) सातारा गॅझेटियर, पुणे व औंध संस्थान गॅझेटियरची कायदेशीर तपासणी करुन १५ दिवसांत मान्यता देण्यास उपसमिती तयार.
३) सप्टेंबरअखेरपर्यंत आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेतले जाणार.
४) मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्यांच्या वारसांना सरकार आर्थिक मदत देणार, आठवड्यात मदत जमा होणार.
५) गावातील कुळातील नात्यातील व्यक्तींना चौकशी करुन कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यात येणार.
मराठा – कुणबी एकच असल्याचा आदेश कधी काढणार?
मराठा आणि कुणबी एकच असल्याचा आदेश काढण्यासाठी थोडा अभ्यास करावा लागेल, त्यासाठी थोडा अवधी आवश्यक असल्याचे समितीने सांगितले आहे. यासाठी एक ते दोन महिने वेळ लागण्याची शक्यता असून, जरांगेंनी त्यासाठी सकारात्मकता दर्शवली आहे. तसेच, आठ लाख हरकती असल्याने सगेसोयरेचा आदेश काढण्यासाठी थोडा वेळ लागणार असल्याचे मराठा उपसमितीने मनोज जरांगेंना शब्द दिला आहे.
गेल्या चार दिवसांपासून आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावर बसलेल्या मनोज जरांगे यांनी मराठा – कुणबी एकच असल्याचा शासन निर्णय जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मुंबई न सोडण्याचा निर्धार केला होता. तसेच, हैदराबाद आणि सातारा गॅझेटियर लागू करण्याची मागणी देखील त्यांनी केली होती. यापूर्वी शिंदे समितीने जरांगे यांची घेतलेली भेट निष्फळ ठरली होती. दरम्यान, आता उपसमितीने भेट घेऊन जरांगेंच्या काही मागण्या मान्य केल्या आहेत.
उपसमिनीने मान्य केलेल्या मागण्यामुळे मनोज जरांगेंच्या उपोषणाचे हे मोठे यश मानले जात आहे. जरांगे यांचे उपोषण बेकायदा असल्याचे सांगत त्यांच्या विरोधात गुणरत्ने सदावर्ते यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. दुसऱ्या दिवशी झालेल्या सुनावणीनंतर जरांगे यांनी आज (०२ सप्टेंबर) दुपारी तीन वाजेपर्यंत आझाद मैदान सोडण्याचे आदेश देण्यात आले होते.
विखे पाटील यांंच्या अध्यक्षतेखालील उपसमितीने जरांगे पाटील यांची भेट घेऊन विविध मागण्या मान्य केल्या. दरम्यान, हैदराबाद गॅझेट लागू झाल्याचा शासन निर्णय हातात मिळत नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नसल्याचे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.