सोलापूर |
चित्रपटात अभिनयाची संधी देण्याचे आमीष दाखवून चित्रपटाच्या दिग्दर्शकाने एका तरूणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार बार्शी तालुक्यात घडला आहे. दबाव झुगारत पीडित तरूणीने पोलिसांत धाव घेतली असता चित्रपट दिग्दर्शकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय पाटील (वय ५०, रा. गणराज कॉलनी, सन फार्माजवळ, बोलेगाव फाटा, नागापूर एमआयडीसी, अहमदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या चित्रपट दिग्दर्शकाचे नाव आहे. त्याला अजून अटक झालेली नाही.
मूळ सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे राहणाऱ्या आणि सध्या पालघर जिल्ह्यात नालासोपारा येथे वास्तव्यास असलेल्या पीडित तरूणीने दिग्दर्शकाच्या विरोधात तक्रार केली आहे. तिने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की, धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील येडशी येथे २० सप्टेंबर २०२२ रोजी ‘भाऊचा धक्का ‘ या मराठी चित्रपटासाठी आयोजित अभिनयाच्या कार्यशाळेस पीडित तरूणी गेली होती.
कार्यशाळा सुरू असताना चित्रपट कंपनीचा मुक्काम येडशीपासून जवळ असलेल्या उक्कडगाव (ता. बार्शी) येथील डॉ. चंद्रभान सोनवणे कनिष्ठ महाविद्यालयाच्या इमारतीत होता. तेथे दिग्दर्शक संजय पाटील याने पीडित तरूणीला आपल्या खोलीवर बोलावले. मी तुला चित्रपटात चांगली भूमिका देणार आहे. त्यासाठी तुला हे सारे करावेच लागेल, असं बोलून चांगली भूमिका देण्याचे आमीष दाखवलं. संजय पाटील याने पीडित तरूणीची इच्छा नसतानाही तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तिने दिग्दर्शक संजय पाटील याचा अत्याचार सहा महिने सहन केला.
त्याच्या विरोधात पीडित तरूणीची तक्रार करण्याची इच्छा होती. मात्र तिला चित्रपटात कामाची गरज होती. जर तक्रार केली असती तर संजय पाटील याने चित्रपटातून काढून टाकले असते आणि पीडित तरूणीला भूमिका मिळाली नसती. त्यामुळे तिने संजय पाटील याच्या विरोधात पोलिसांत तक्रार देण्याचे धाडस केले नाही. मात्र लैंगिक अत्याचार सहन न झाल्यामुळे शेवटी तिने पांगरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन दिग्दर्शक संजय पाटील याच्या विरोधात फिर्याद नोंदविली. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक जायपत्रे हे करीत आहेत.