“बिष्णोई गँगमार्फत माझा खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे”, असा दावा भाजपा आमदार सुरेश धस यांनी केला आहे. ते म्हणाले, “खोक्या भोसले आणि माझं नाव जोडून माझ्यावर वेगवेगळे आरोप केले जात आहेत, माझ्याविरोधात आंदोलन चालू आहे, राजस्थानमधील बिष्णोई समाजाच्या लोकांना मुंबईत आणून माझ्याविरोधात वक्तव्ये करायला लावली जात आहेत.हे सगळं बिष्णोई टोळीपर्यंत पोहचवून माझा काटा काढण्याचं षडयंत्र रचण्यात आलं आहे.”
सुरेश धस म्हणाले, “खोक्या भोसले प्रकरण समोर आल्यावर मी स्पष्ट सांगितलं होतं की त्याच्यावर कारवाई करा. मी त्याला लपवण्याचा प्रयत्न केला नाही किंवा पोलिसांना देखील फोन केला नाही. मात्र, काही लोक परळीवरून माझ्या मतदारसंघात पाठवण्यात आले. खोक्याच्या आडून माझ्यावर टीका केली. मला या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला.”
खोक्या हरणाची शिकार करतो असे दावे करण्यात आले : सुरेश धस
आमदार धस म्हणाले, “काही लोकांनी, परळीवरून आलेल्या काहींनी खोक्याच्या आडून माझ्यावर वैयक्तिक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. खोक्या अमूक प्राण्याची शिकार करतो, तो हरणाची शिकार करतो, हरणाचं मांस सुरेश धसला पाठवतो, अशी वक्तव्ये करण्यात आली. माझ्याविरोधात मोर्चा काढण्यात आला. त्या मोर्चात २०० लोक होते. ठराविक लोकांचा गट त्यात सामील होता. त्यानंतर त्यातले काही लोक मुंबईला गेले, उपोषणाला बसले. तिथे राजस्थानवरून बिष्णोई समाजाचे चार लोक आणले होते. त्यांना माझ्याविरोधात वक्तव्ये करण्यास सांगितलं.
आष्टीचे आमदार सुरेश धस म्हणाले, “बिष्णोई समाजातील लोकांना माझ्याविरोधात बोलायला सांगितलं. परस्पर बिष्णोई टोळीमार्फत माझा काटा निघाला तर निघाला, असा विचार करून ते षडयंत्र रचण्यात आलं होतं. बिष्णोई समाज हरणाला देवासमान मानतो. खोक्या, हरीण, मांस हे प्रकरण या प्रकारे कुख्यात गुंड लॉरेन्स बिष्णोईपर्यंत जाऊ द्यायचं आणि त्याच्यामार्फत माझा काटा काढायचा, असा कट रचण्यात आला होता. माझ्या मुलाखतीनंतर अंजली दमानिया (सामाजिक कार्यकर्त्या) व तृप्ती देसाई (भूमाता ब्रिगेटच्या अध्यक्षा) यांनी माध्यमांसमोर येऊन माझ्यावर टीका केली.” सुरेश धस हे एबीपी माझाशी बोलत होते.
सुरेश धस यांचा रोख कोणाकडे?
दरम्यान, यावेळी धस यांना विचारण्यात आलं की तुमचा नेमका कोणावर आरोप आहे? तुमचा रोख कोणाकडे आहे? त्यावर आमदार सुरेश धस म्हणाले, माझ्याविरोधात कट कोणी रचला आहे ते मला माहिती आहे. परंतु, मी सध्या शांत आहे. बिष्णोई समाजातील लोकांना मुंबईत कोणी आणलं, त्यांच्याशी संपर्क कोणी केला, त्यांची तिकीटं कोणी काढली ही सर्व माहिती माझ्याकडे आहे. मी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देणार आहे. बीडमधील राजकारण्यांचा यात हात आहे. मी कोणाचंही नाव घेणार नाही. याप्रकरणी चौकशी होईल आणि त्या चौकशीतून गुन्हेगाराचं नाव समोर येईल, अशी माला अपेक्षा आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण मी उकरून काढलं, मी देशमुख कुटुंबाची बाजू लावून धरली. त्यामुळे काही लोक हे अशा पद्धतीचं राजकारण करत आहेत.