छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय क्रीडा संकुलातील कंत्राटी कर्मचाऱ्याने २१ कोटी रुपयांचा घोटाळा केला. क्रीडा आयुक्तांनी आता राज्यातील क्रीडा विभागात कार्यरत असलेल्या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सर्वाधिकार काढून घेतले.शिवाय कंत्राटी कर्मचाऱ्यांकडे कोणत्याच लेखा विभागाचे काम सोपवण्यात येऊ नये, असा आदेश दिला. छत्रपती संभाजीनगर विभागीय क्रीडा संकुल समितीच्या खात्यातील कंत्राटी असलेल्या संगणक ऑपरेटर हर्षकुमार क्षीरसागर (वय २१) याने तब्बल २१ कोटी रुपये आपल्या खात्यावर वळती करून पोबारा केला.
वेव मल्टिसर्व्हिस संस्थेच्या वतीने विभागीय क्रीडा संकुल १९ कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली. यात हर्षकुमारला विभागीय संकुलात संगणक ऑपरेटर म्हणून नियुक्ती देण्यात आली होती. हर्षने अवघ्या दोन वर्षांत विभागीय क्रीडा संकुल समितीच्या पैशांवर डोळा ठेवत एक-एक करून सर्व रक्कम आपल्या खात्यात वळती केली. यातून त्याने सहा महिन्यांपूर्वी बीएमडब्ल्यू कार, एक कोटी रुपयांचा फ्लॅट आणि चार घरांची खरेदी केली. त्यामुळे आता कंत्राटी कर्मचाऱ्यांचे अधिकार काढण्याचा आदेश क्रीडा आयुक्तांनी दिला.
असे आहेत आदेश
राज्यातील विभागीय क्रीडा संकुल तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाअंतर्गत भरण्यात आलेल्या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांचे अधिकार काढण्यात आले. या कंत्राटी कर्मचाऱ्यांना लेखा विभागातील तसेच बँकेसंदर्भातील कोणतेच व्यवहार दिले जाऊ नये असे आदेशात म्हटले आहे. यासोबतच संकुल समितीचे खाते असलेल्या बँकांना पत्र देण्यात आले, की क्रीडा संकुल समिती अंतर्गत होणाऱ्या मोठ्या रकमेचा व्यवहार हा संबंधित विभागातील अधिकारी असल्याशिवाय करण्यात येऊ नये. त्याची पडताळणी करावी व इंटरनेट बँकिंग संदर्भात विभागाला कळवावे, असे आदेशात नमूद केले आहे.
अडीच लाख जागा रिक्त
राज्य शासनाच्या एक जुलै २०२३ च्या परिपत्रकानुसार राज्यामध्ये विविध विभागाअंतर्गत चार लाख ७८ हजार ८२ जागांपैकी दोन लाख ४५ हजार ९४४ जागा या रिक्त आहेत. या जागेवर राज्य शासनाने कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची नेमणूक केली. यात महत्त्वाच्या विभागामध्ये त्यांचा सामावेश आहे.
७० कोटींपर्यंत घोटाळा झाल्याची शक्यता
विभागीय क्रीडा संकुल समितीमध्ये हर्षकुमारने २१ कोटींचा घोटाळा केला. त्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. यात २१ कोटींच्या घोटाळ्या व्यतिरिक्त दैनंदिन व्यवहारातही मोठा व्यवहार झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे हा आकडा जवळपास ७० कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
ज्या दिवशी हा प्रकार घडला, त्याच्या दुसऱ्या दिवशीच संबंधित आरोपीचे व विभागातील खात्याची माहिती घेत बँकेला खाते गोठविण्यात सांगितले. या घटनेची खबरदारी घेत राज्यातील सर्व क्रीडा विभागात असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे अधिकार काढून घेण्यात आले आहेत. कंत्राटी कर्मचाऱ्याला बँकिंग संदर्भातील कामे देण्यात येऊ नये असे आदेशित केले.
– सूरज मांढरे, क्रीडा आयुक्त.