मुंबई |
छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून दूर करू शकता. पण एका खुनाच्या कटकारस्थानाचा संशय ज्यांच्यावर आहे अशा व्यक्तीला मंत्री मंडळापासून दूर ठेवत नाही. कारण तुमचं जातीचा राजकारण आहे, असा आरोप करत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे.
पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले, तुम्ही एक समाज वापरून घेत आहात छगन भुजबळ यांना तुम्ही दूर ठेवता. काही आमदारांचा म्हणे विरोध आहे. पण जनतेचा विरोध आहे, बीड व महाराष्ट्रातल्या मोठ्या समाजाचा विरोध आहे की संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये किंवा हत्येच्या कारस्थानात ज्यांच्या संशयास्पद हात आहे अशी व्यक्ती राज्याच्या मंत्रिमंडळात नको. अशा घोषणा अजित पवार यांच्यासमोर देण्यात आल्या आहेत.
मंत्री बीडला जाऊन भाषणं करत आहेत. पण आधी खऱ्या आरोपींना पकडा ना खोटे आरोप टाकून विरोधकांना पकडले. त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले. पण जे खरे गुन्हे घडले आहेत, खून, हत्या, बलात्कार त्यावर काही करत नाही. बीड आणि परभणीची जी अवस्था केली आहे तुमच्या गुंडांनी त्यासंदर्भात बोलला तर बरं होईल, असा टोलाही राऊत यांनी लगावला.
राहुल गांधी यांच्या दौऱ्याबाबत राऊत म्हणाले, या देशामध्ये विरोधी पक्षाने, जनतेने, नागरिकाने काय करावं, कुठे जावं, काय बोलावं, काय खावं कोणत्या भूमिका मांडाव्या हे नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस ठरवणार का ? या देशात लोकशाही आहे.
महाराष्ट्राची परिस्थिती बिहार पेक्षा गंभीर आहे हे फडणवीस यांनी समजून घ्यावे. परभणी आणि बीडमध्ये ज्या घटना घडल्या आहेत त्या राज्याला कलंक, काळीमा फासणाऱ्या आहेत.त्या भयंकर अपराधाशी संबंधित असलेले संशयित गुन्हेगार आपल्या मंत्रिमंडळात आहेत. मिस्टर फडणवीस बीड आणि परभणी संदर्भात ज्यांच्यावर लोकांचा संशय आहे रोष आहे अशी लोकं आपल्या मंत्रिमंडळात आहेत आपण त्यांना घेतले आहे. न्यायाच्या गोष्टी करत आहात, स्वतः एकदा बीड ला जा, गृहमंत्री म्हणून गेलात का एकदा बीडला ? राहुल गांधी बीड गेले किंवा परभणीला गेले यामुळे आपलं पित्त का खवळावं ?
राहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आहेत, भारतीय संविधानाने त्यांना दर्जा दिलेला आहे. लोकसभेत विरोधी पक्षनेता म्हणून कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा त्यांना आहे. नरेंद्र मोदी अमित शहा आणि आपण दिलेला नाही.जेव्हा आपल्या हातात होतं तेव्हा विरोधी पक्ष नेते पद त्यांना मिळू दिले नाही. आता लोकसभेच्या आकडेवारीनुसार प्रचंड अशा आपल्या बहुमत नाही हे आधी मान्य करा. मोदींना बहुमत नाही मोदी कुबड्यांवर आहेत. राहुल गांधी परभणीत आले तेव्हा आपण जायला पाहिजे होतं. गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री म्हणून आपण गेलात का? आपल्याला भीती वाटते जाण्याची. गेलात तरी बहुतेक सैन्य घेऊन जाल. आपण राहुल गांधीवर टीका करतात द्वेष पसरवत आहात. त्या कुटुंबाचा, त्या माऊलीचा त्यांच्या मुलांचा आक्रोश तर आपल्या कानाचा पडदा फाडत नसेल तर आपण या राजाचे मुख्यमंत्री म्हणून निर्दयी आहात.राहुल गांधी आले मी त्यांचे आभार मानतो, राहुल गांधी यांच्यामुळे बीडचा अपराध हा देशपातळीवर गेला आणि आपली बेअब्रू झाली, असे राऊत म्हणाले.
इलेक्शन कमिशन चोर असल्याच्या मुद्यावर राऊत म्हणाले, इलेक्शन कमिशनची जबाबदारी आहे चोर नाही हे सिद्ध करून दाखवायची.आम्ही सिद्ध करू शकतो की तुम्ही चोर आहात. तुम्ही आता जनतेच्या न्यायालयात आहात तुम्ही आम्हाला दाखवून द्या की तुम्ही चोर नाही आहात. महाराष्ट्रातील जनता रस्त्यावर आली आहे तुमच्या विरोधात तुमची चोरी पकडली गेली आहे. गावागावात तुमची चोरी पकडली गेली आहे. चोरी पकडली गेली आहे म्हणून तुम्ही न्यायव्यवस्था बदलली आहे.