शिक्षकाच्या खून प्रकरणात बीड न्यायालयाने 14 जणांना दोषी ठरवले असून याचा निकाल पुन्हा सोमवारी दिला जाणार आहे. या निकालाप्रकरणी न्यायालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.यातील आरोपींवर मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल असल्याने वरिष्ठ दर्जाचे पोलीस कर्मचारी देखील या ठिकाणी उपस्थित होते.
बीड शहरातील बालेपीर भागात १९ सप्टेंबर २०१९ रोजी सैनिकी विद्यालयातील शिक्षक सस्बद साजेद अली यांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात एकूण १८ आरोपींविरुध्द शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला होता. पोलीसांनी या प्रकरणाचा तपास करून दोषारोपत्र न्यायालयात दाखल केले होते. सदरील प्रकरण जिल्हा न्यायालयातील विशेष न्यायाधीश सुरेखा पाटील यांच्या न्यायालयात सुरू होते.
या प्रकरणी न्यायालयाने एकूण ४४ साक्षीदार तपासले तर बचाव पक्षातर्फे ५ साक्षीदार तपासण्यात आले. सदरील प्रकरणात फिर्यादी आणि साक्षीदार, इतर परिस्थितीजन्य पुरावा, वैद्यकीय पुरावा, न्याय वैद्य प्रयोग शाळा यांचा अहवाल तसेच सहाय्यक सरकारी वकील अॅड. अजय तांदळे यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश १ तथा विशेष मोक्का न्यायाधीश श्रीमती एस. आर. पाटील यांनी गुजर खान सह १४ जणांना दोषी ठरवले तर तिघांची निर्दोष मुक्तता केली. याप्रकरणी सोमवारी निकाल दिला जाणार आहे.