मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे, शिवसेनेचे विद्यमान आमदार सदा सरवणकर आणि उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक महेश सावंत अशा तिरंगी लढती होती. माहीम विधानसभा मतदारसंघात अखेरीस महेश सावंत यांचा विजय झाला आहे. तर राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे आणि शिंदेंचे शिलेदार सदा सरवणकर यांचा देखील पराभव झाला.
सदा सरवणकर हे माहीम विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व शिवसेनेकडून करीत होते. एकनाथ शिंदे यांच्या बंडात त्यांनी शिंदे यांना साथ दिली. माहीम, माटुंगा, दादर हा परिसर शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. याच परिसरात राज ठाकरे यांचे वास्तव्य आहे. त्यामुळे मनसेचाही या परिसरात बोलबाला आहे. मराठी मध्यमवर्गीय नागरिकांचा भरणा असल्यामुळे येथे शिवसेनेला मानणाराही मोठा वर्ग आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा दरवर्षी याच परिसरात घेण्यात येतो. त्यामुळे तिन्ही गटांसाठी हा मतदार संघ प्रतिष्ठेचा आणि महत्त्वाचा होता.
विधानसभा निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांनी सदा सरवणकर यांना उमेदवारी जाहीर केली. विद्यमान आमदार असल्यामुळे ते सहाजिक होते. मात्र राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे माहीम मधून लढण्यासाठी आग्रही होते. यावरून शिंदे आणि राज ठाकरे यांच्या दरम्यान चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या मात्र कोणीही मागे हटण्यास तयार नव्हते. माहीमची जागा शिंदे यांनी राज ठाकरे यांच्यासाठी सोडून द्यावी, असा आग्रह भाजपच्या नेत्यांनीही धरला होता. पण सदा सरवणकर यांनी माघार घेतली नाही. अखेरच्या टप्प्यात ते राज ठाकरे यांच्या भेटीसाठीही गेले होते मात्र राज यांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही आणि अमित ठाकरे माहीमच्या मैदानात उतरले.
दुसरीकडे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने महेश सावंत या सामान्य शिवसैनिकाला उमेदवारी दिली होती. महेश सावंत हे माहीम परिसरात सामान्य शिवसैनिक आणि वेळ प्रसंगाला धावून जाणारे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. माहींमच्या कोळीवाड्यात त्यांची स्वतःची अशी प्रतिमा आहे. या परिसरातील मुस्लिम मतदार उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी राहणे साहजिक होते. त्यामुळेच या मतदारसंघात नेमके काय होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.
माहीम विधानसभा मतदारसंघाचा कानोसा घेतला असता सदा सरवणकर यांना कमी प्रतिसाद मिळत असल्याचे सांगण्यात येत होते. अमित ठाकरे यांनी प्रचारात आघाडी घेतली होती. राज ठाकरे यांच्यासारख्या हुकमाचा एक्का त्यांच्या पाठीशी असल्यामुळे अमित ठाकरेच या मतदारसंघातून निवडून येतील असा राजकीय पंडितांचा अंदाज होता. तर मुस्लिम मतदार, कोळी बांधव आणि बंडखोरीमुळे दुखावले गेलेले निष्ठावंत शिवसैनिक यांच्या पाठिंब्यावर महेश सावंत माहीमचे मैदान मारतील अशी भविष्यवाणी वर्तवली जात होती.