संगमनेर |
आज सकाळपासून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली. या निकालानुसार जनतेने महायुतीला बहुमत दिल्याचे समजत आहे. या सगळ्यामध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचा तर पराभव झालाच पण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचादेखील धक्कादायक पराभव झाला आहे.
काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये असलेले बाळासाहेब थोरात, शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अमोल खताळ आणि मनसेकडून योगेश सूर्यवंशी निवडणुकीच्या रिंगणात होते. या निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांचा अमोल खताळ यांच्याकडून पराभव झाला आहे. सहकाराचा बालेकिल्ला असणाऱ्या या मतदारसंघावर काँग्रेसची मजबूत पकड होती. मात्र आता हा मतदार संघ काँग्रेसच्या ताब्यातून गेला आहे.
२०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेच्या साहेबराव नवले यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांना १ लाख २५ हजार ३८० हजार मते मिळाली होती. तर साहेबराव नवले यांना ६३१२८ मते मिळाली होती. आजवरच्या निवडणुकीतील सर्वाधिक ६४ टक्के मते थोरात यांना मिळाली होती. उत्तरोत्तर मताधिक्यामुळे थोरात यांचा गड अधिक मजबूत झाला होता. मात्र यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसला आपला गड राखण्यात अपयश आले आहे.