दुकानाचा परवाना नुतनीकरण करण्यासाठी 200 रूपयांची लाच घेणं दुकान निरीक्षक अधिकाऱ्याला महागात पडले आहे. याबाबत न्यायालयाने निकाल देताना या अधिकाऱ्याला 6 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे दोनशे रुपयांच्या नादात हा अधिकारी आता सहा वर्षासाठी तुरुंगाची हवा खाणार आहे. ही घटना धाराशीवमध्ये घडली आहे. या निकालानंतर लाचखोरांना आता तरी चाप बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
विवेक वासुदेव हेडाऊ हे दुकाने निरीक्षक सरकारी कामगार अधिकारी कार्यालय धाराशिव इथे कार्यरत होते. राज ऑफसेट व स्टेशनरी सप्लायर्स यांच्या दुकानाच्या परवान्याचे नुतनीकरण करायचे होते. त्यासाठी ते हेडाऊ यांच्याकडे गेले होते. विवेक हेडाऊ यांच्याकडे दुकानाचा परवाना नुकनीकरणाचे अधिकार होते. त्यांनी यावेळी संबधीत दुकानदाराकडे 200 रूपये लाचेची मागणी केली. त्यानंतर त्यांनी ते 200 रूपये स्विकारले. त्यानंतर ते ठेवण्यासाठी कार्यालयातील लेखनिक दत्तात्रय आनंदराव दाने याच्याकडे दिले.
हा सर्व प्रकारच लाचलूचपत प्रतिबंध अधिकाऱ्यांसमोरच घडला. त्यांनी त्यांना रंगेहात पकडले. या प्रकरणी या दोघांवरही घटना दाखल करण्यात आला. त्याचा निकाल आता न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणी विवेक वासुदेव हेडाऊ या अधिकाऱ्याला दोन वेगवेगळ्या कलमा खाली कोर्टाने 3-3 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. अशी सहा वर्षाची संयुक्त शिक्षा आता त्यांना भोगावी लागणार आहे. त्याच बरोबर दोन हजाराचा दंडही ठोठावला आहे.
दंड न भरल्यास एक महिन्याचा कारावास सोसावा लागणार आहे. दरम्यान या प्रकरणातील दुसरा आरोपी लेखनिक दत्तात्रय याची मात्र निर्दोष मुक्तता केली आहे. या निकालानंतर लोकांनी जागृत व्हावे. जर कोणी अधिकारी कर्मचारी सरकारी कामासाठी पैशाची मागणी करत असेल तर त्याची तातडीने तक्रार करावी असे आवाहन पोलिसांनी केली आहे.