महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी उद्या अर्थात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. यासाठी निवडणूक आयोग आणि इतर प्रशासकीय यंत्रणांकडून मतदानाची तयारी सुरू झाली आहे.
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे देखील विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरले होते मात्र, नंतर त्यांनी माघार घेतली. अश्यातच, मतदानाच्या एक दिवस आधी मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला भावनिक आवाहन केलं आहे.
समाज माध्यमांशी बोलताना जरांगे म्हणाले की, ‘मतदान करताना विचारपूर्वक मतदान करा, आपल्या हाल- अपेष्टा डोळ्यासमोर ठेवा. वेळेवर भावनिक होऊ नका. हा माझा नेता हा माझा नेत्याचा मुलगा आणि त्याला मतदान करावंच लागेल, असं न करता तुमचे कष्ट डोळ्यासमोर समोर ठेवा. तुम्ही विचार नाही केला तर कधी मोठे होणार आहात. विचारपूर्वक मतदान करा, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे.
ते पुढे म्हणाले की, मी लोकसभेला सांगितले होते, कोणाला पडायचे त्याला आणि कोणाला निवडून आणायचे त्याला निवडून आणा, आणि विधानसभेला पण तेच सांगत आहे. मी कोणालाही पाठिंबा दिला नाही आणि माझी कुठेही टीम पाठवली नाही. मी महाराष्ट्रमधील कोणत्याही मतदार संघातील, मग तो कोणत्याही पक्षाचा असो, मी कोणालाही पाठिंबा दिला नाही, असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.
मराठ्यांनी एकजुटीने 100 टक्के मतदान करा. पण ज्याने आरक्षणाला ज्यांनी विरोध केला आहे. त्यांना सोडू नका. राजकारणापेक्षा मला आरक्षण महत्वाचे आहे, आणि ते मी मिळवून देणार आहे. मराठ्यांनी संभ्रम ठेवू नये. कोणाचेही सरकार आले तर आपल्याला लढावेच लागणार आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.
कालिचरण महाराज यांच्या टीकेला मनोज जरांगेंचे उत्तर
तसेच जरांगे यांनी कालिचरण यांच्यावर सडकून टीका करताना म्हणाले,”मी साधू-संताचा आदर करतो. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदुत्व मानतो. माझ्याबद्दल जे बरळत आहेत, त्यांना बरळू द्यावे. कारण ज्याने एका पक्षाचा ठेका घेतला आहे,
अशांबद्दल आपण काही बोलले नाही पाहिजे. संत-महात्म्यांचा आदर करणे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवले आहे. आम्ही ज्या हिंदू धर्मात आहोत, त्यातील सर्वात कट्टार वर्ग आहे मराठा समाज. पण हाच समाज आज अडचणीत आलेला आहे.”
आम्ही आरक्षण मागतो, याचा अर्थ आम्ही जातीवाद करत नाहीत. आम्ही हिंदूच आहोत. पण गरीबांच्या मुलांना आरक्षण दिले जात नाही. वाकडी टिकली लावलेले स्वतःला धर्माचे रक्षक मानतात. पण धर्माची खरी रक्षक जनता आहे.
जनता स्वतःच्या अंगावर वार सोसते. हे टिकली लावणारे संत फक्त सुपाऱ्या, नारळ, पैसे घेऊ शकतात. खरा हिंदू धर्म वारकरी, गरीब जनता चालवत आहे. हरळ खाऊन जगणारे लोक धर्माचे ठेकेदार नाहीत. मराठा कट्टार हिंदू आहे आणि राहणारच”, असेही म्हणाले.