महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आज शेवटचा रविवार असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या प्रमुख नेत्यांच्या सभा ठिकठिकाणी आयोजित केल्या होत्या.
महाविकास आघआडीकडून मुंबईच्या वांद्रे कुर्ला संकुलातील मैदानावर जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत शिवसेना (ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर तोफ डागली. “महायुतीकडून बटेंगे तो कटेंगे घोषणा दिल्या जात आहेत. मी जर मुख्यमंत्री असतो तर यांची अशी हिंमत झाली नसती. पण लक्षात घ्या, मुंबईवर घाला घातला तर ‘हम तुम्हे काटेंगे’, असे हिंदीत म्हणत उद्धव ठाकरे यांनी महायुतीला इशारा दिला. यावेळी त्यांनी भाजपावर टीका करताना पंकजा मुंडे यांचे आभार मानले.
पंकजा मुंडे यांचे आभार का मानले?
उद्धव ठाकरे भाजपावर टीका करत असताना म्हणाले, “पंकजा ताई तुझे खूप आभार. तू महाराष्ट्राच्या डोळ्यावरची पट्टी काढलीस. जसे आमच्या चंद्रचूड साहेबांनी न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी सोडून स्वतःच्या डोळ्यावर बांधली होती. तशी तू महाराष्ट्राच्या डोळ्यावरची काढली.” उद्धव ठाकरे यांनी पंकजा मुंडे यांच्या एका विधानाचा हवाला दिला. ते म्हणाले, “पंकजा ताई म्हणाल्या की, भाजपाचे काम खूप भारी आहे. महाराष्ट्रात ९० हजार बुथ आहेत. प्रत्येक बुथवर भाजपाचे दक्षता पथक आहे. या पथकात जर दोन माणसे असतील तर त्यांची संख्या १ लाख ८० हजार होते. जर दोन पेक्षा जास्त लोक असतील तर त्या पटीत त्यांची संख्या वाढेल. ही सर्व लोक भाजपाने गुजरातमधून आणली आहेत.”
“भाजपाने ही माणसे आपल्यावर नजर ठेवायला आणली आहेत. ही आज नजर ठेवायला माणसे आणली आहेत. उद्या यांचा आपली मुंबई आणि महाराष्ट्र बळकविण्याचा डाव आहे. हे तर आता फेक नरेटिव्ह नाही ना. कारण हे मी पंकजा मुंडे बोलल्यानंतर बोलत आहे. याचा अर्थ भाजपा इथे पराभूत झालेली आहे. त्यांचे लोक इथे राहिलेले नाहीत. विशेष म्हणजे महाराष्ट्रात राहिलेल्या भाजपाप्रेमींवर भाजपाचा विश्वास राहिलेला नाही. त्यामुळेच त्यांना परराज्यातून माणसे आणून नजर ठेवावी लागत आहे”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
पहिल्याच कॅबिनेट बैठकीत अदाणीच्या घशातील जमीन काढू
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “महाविकास आघआडीचे सरकार आल्यानंतर पहिल्याच कॅबिनेट बैठकीत अदाणीच्या घशात घातलेली मुंबई सर्वात आधी काढून घेऊन. धारावीकरांना त्यांचे घर आणि उद्योगासह तिथेच पुनर्वसन केले जाईल. ज्या जागा अदाणीला दिल्या आहेत त्या काढून घेऊ. तसेच एमएमआरडीएबरोबर केलेला करार मोडीत काढू. मुंबई मनपा स्वायत्त आहे, तिच्या अधिकारावर गदा आणत असाल तर कदाचित मी एमएमआरडीएदेखील रद्द करून टाकेल. नीती आयोगालाही मुंबईतून बाहेर काढू. तसेच मुंबई महानगर प्रदेशात मुंबईकरांसाठी परवडणाऱ्या दरात घरे बांधून देईन, हेदेखील वचन मी देत आहे.”