मराठा आरक्षणाला आकार देणारे नेते मनोज जरांगे यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सगेसोयरेची राज्य सरकारने अंमलबजावणी न केल्याने आता मोठा निर्णय घेतला आहे.सध्या त्यांनी मुंबईच्या 23 जागांवर आपले लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे.
बेसावध राहण्याचे दिवस आता संपले आहेत. तुमच्या जातीचे पोरं तुम्हाला वाचवायचे आहेत. आंतरवालीत सांडलेलं रक्त आठवा. कोणीही हट्ट करू नका. ज्या समाजाने तुमच्यावर विजयाचा गुलाल टाकायचा ठरवला आहे. त्यांचे हात छाटू नका. त्यांचे पंख कापू नका. तुम्हाला 6 कोटी मराठ्यांना तोंड द्यायचे आहे. आपल्याला आपली जात वाचवायची आहे कायम लक्षात ठेवा.
कोणीतरी आमदाराने सांगितलं म्हणून तसं वागू नका. अशी झुंज द्या बाळाहो, तुमच्या तोंडावर हात फिरवून सर्वांनी तुम्हाला आशीर्वाद दिले पाहिजेत असं लेकरू बना. नेत्यांसाठी, पक्षासाठी कोणाला वेठीस धरू नका. आता लढायचं ठरवलं आहे तर मागे हटू नका.
समाजाचा अपमान होणार नाही याची काळजी घ्या. समाजातील उमेदवारांवर गुलाल टाकण्यासाठी सज्ज व्हा. मराठ्याच्या पोटी जन्म घेऊन आपण त्यांना आरक्षण देऊ नाही यासाठी जीव तीळ तीळ तुटतो. माझ्या आई बहिणीच्या डोक्यात गोळ्या घातल्या. त्यांचं कुंकू पुसलं. माझ्या समाजाला दिलेला शब्द मी पाळणार. माझ्या समाजाच्या आरक्षणाचा हातातोंडाशी आलेला घास यांनी हिरावून घेतला आहे.
एवढा अपमान आमचा कोणीही केला नाही. मी माझ्या समाजावर झालेल्या अन्यायाचा मी बदला घेणार आणि तेव्हाच मरणार. मला काहीही नको. मला माझ्या कुटुंबाची पर्वा नाही, मला फक्त माझ्या समाजाची पर्वा आहे. माझ्या समाजाला संपवणाऱ्यांना आपण आता संपवायचं आहे आणि या सर्वांचा पाडाव केला पाहिजे.
आपल्या आईवडिलांनी आपल्याला क्षत्रिया सारखं लढायला शिकवलं आहे. एखाद्या विजयी योद्ध्यासारखी आपल्याला लढत द्यायची आहे. या समाजावर या सरकारने खूप वाईट दिवस आणलेले आहेत. आई बाप कोणालाही आपलं दु:ख सांगू नका.
आमच्या उमेदवारांना त्रास देऊ नका. त्रास देणाऱ्यांना, सत्ताधाऱ्यांना सोडणार नाही. त्रास देणाऱ्यांना आधी संपवणार. राज्यात 10 ते 15 जागा लढवणार. परभणीतील पाथरी, गंगाखेड, बीडमध्ये,निफाड, नांदगाव, धुळे शहर, माढा, पाचोरा नेवासा, कन्नड, वसमत, हिंगोली, परतूर, फुलंब्री, हदगाव, कळंब, भूम, परांडा धाराशिव, दौंड, पर्वती, पाथर्डी, शेवगाव, लोहा, तुळजापूर या ठिकाणी उमेदवार देणार आहे. उद्या सकाळी 7 पर्यंत उमेदवारांची नावे घोषित करणार असल्याचे जरांगे पाटील यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.