आष्टी |
गेल्या पाच वर्षांत आपण मतदार संघात साडेतीन हजार कोटींचे विकास कामे आणली. पण हे विकासकामे यांना दिसतील कधी, तुम्ही कमळाचे चिन्ह आणले पण हा बाळासाहेब आजबे पण राजकारणात लेचापेचा नाही. या निवडणुकीत होऊन जाऊदे, तुझे कमळ तर माझे घड्याळ, असे जाहिर आव्हान विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे यांनी भाजपाचे सुरेश धस यांना सभेतून दिले. आमदार आजबे यांनी घड्याळाचा एबी फॉर्म मिळाल्याचे सांगत धस यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
गेवराईच्या बदल्यात आष्टीची जागा भाजपने घेतली. याठिकाणी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे यांना डावलून सुरेश धस यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. मात्र, आज इच्छुक आमदार आजबे यांनी देखील अजित पवार राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महायुतीमध्ये सर्व आलबेल नसल्याचे पुढे आले आहे. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या सभेत आ. बाळासाहेब आजबे बोलत होते.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य दशरथ वनवे, शिवाजी नाकाडे, भाऊसाहेब लटपटे,धैर्यशिल थोरवे, नवनाथ सानप,विठ्ठल नागरगोजे,पोपट शेंडे, विश्वास नागरगोजे,दिपक घुमरे, हारिभाऊ दहातोंडे, महादेव डोके, नामदेव शेळके आदींची उपस्थिती होती.
मला पैसे खाण्यासाठी आमदारकी नको
पुढे बोलतांना आ.आजबे म्हणाले, मला पैसे खाण्यासाठी आमदारकी नको. मला या संधीच सोनं करायचे आहे. तालुक्यात पाणी आणायचे आहे. ते फक्त देखावा करीत आहेत. मागील पंधरा वर्षं त्यांनी काय केले. या भाजपा उमेदवाराने फक्त विकास कामे आडविण्याचे काम केले, असा आमदार तुम्हाला पाहिजे का? असा सवाल त्यांनी केला. तसेच आमच्या कार्यकर्त्यांच्या केसाला धक्का लागला तर मी खोडावर घाव घालीन असा इशाराही आजबे यांनी यावेळी दिला.