मुंबई |
राष्ट्रवादी काँग्रेसने मानखुर्द शिवाजी नगर विधानसभा मतदारसंघातून नवाब मलिक यांना उमेदवारी जाहीर दिली आहे. शेवटची पाच मिनिटे उरलेली असताना नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसक पक्षाकडून मिळालेला एबी फॉर्म निवडणूक अर्जासोबत जमा केला. त्यानंतर त्यांनी आपल्या विजयाचा दावा करत अजित पवारांचे आभारही व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेसने नवाब मलिक यांना मानखुर्द शिवाजी नगरमधून उमेदवारी दिल्यानंतर महायुतीसमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी मलिक यांच्या उमेदवारीवरुन भाष्य केलं.
उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी मानखुर्द शिवाजी नगर मतदारसंघातून नवाब मलिक यांना तिकीट दिले आहे. सुरुवातीला मलिक यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर मलिक यांना राष्ट्रवादीने एबी फॉर्म दिला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याला काही मिनिट शिल्लक असतानाच नवाब मलिक यांनी एबी फॉर्म दिला. त्यामुळे नवाब मलिक हे राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार झाले. आता भाजपने या निर्णयावर तीव्र आक्षेप व्यक्त केला आहे. त्यामुळे महायुतीमध्ये वातावरण चांगलेच तापले आहे. आशिष शेलार यांनी भाजप नवाब मलिक यांचा प्रचार करणार नसल्याचे स्पष्ट केलं आहे.
भाजप नवाब मलिकांचा प्रचार करणार नाही – आशिष शेलार
“भाजपची भूमिका सुरुवातीपासून स्पष्ट राहिली आहे. महायुतीमधील सर्व पक्षांनी आपापले उमेदवार आपणच ठरवायचे आहेत. विषय फक्त राष्ट्रवादी काँग्रेसने नवाब मलिक यांना दिलेल्या उमेदवारीबद्दल आहे. यासंदर्भात भाजपची भूमिका याआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मीही वारंवार स्पष्ट केली आहे. आता पुन्हा एकदा सांगतोय, भाजप नवाब मलिक यांचा प्रचार करणार नाही. आमची भूमिका दाऊद आणि दाऊदशी संबंधित केससंदर्भातील व्यक्तीच्या प्रचाराची नाही,” असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक यांना अणुशक्तीनगर मतदारसंघातून देण्यात आलेल्या महायुतीच्या उमेदवारीबाबतही आशिष शेलार यांनी भाष्य केलं. “आता सना मलिक यांना पाठिंबा देण्याचा प्रश्न उरतो कारण त्या देखील महायुतीच्या उमेदवार आहेत. यासंदर्भातील कोणताही पुरावा किंवा माहिती समोर येत नाही, तोपर्यंत महायुतीचा उमेदवार हाच भाजपचा उमेदवार आहे, याबाबत दुसरा प्रश्न उपस्थितच होत नाही,” असं शेलार म्हणाले.