बीड |
भोगवटादार प्रमाणपत्रासाठी पैशाची मागणी करणाऱ्या लाचखोर तलाठ्यास दोन हजार रुपये घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.
मदन लिंबाजी वनवे वय 35 वर्ष रा. गायकवाड यांचे घर, पंढरी, धानोरा रोड बीड असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे. तक्रारदाराच्या मित्राने मौजे तळेगाव येथे गट क्रमांक 192 मधील मालमत्ता क्रमांक4309 चे मुख्त्यारपत्र तयार करून दिले होते. सदर प्लॉटची ग्रामीण गुंठेवारी करण्यासाठी भोगवटादार प्रमाणपत्राची गरज होती. प्रमाणपत्र देण्यासाठी तलाठी लोकसेवक मदन वनवे याने लाचेची मागणी केली. या प्रकरणाची तक्रार एसीबी कडे करण्यात आल्यानंतर पंचा समक्ष तलाठी वनवे याने तीन हजार रुपये मागितले. मात्र तडजोडी अंती दोन हजार रुपये घेण्यास तलाठी तयार झाला. दरम्यान लाचे चे पैसे स्वीकारताना मदन वनवे यास त्याच्या खाजगी कार्यालयात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.
याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई बीड एसीबीचे उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शेख युनूस, किरण बगाटे, पोलीस अंमलदार, भरत गारदे, हनुमंत गोरे, संतोष राठोड, अविनाश गवळी. गणेश मेहेत्रे यांनी केली.