बारामतीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवार विरुद्ध पवार असा अनोखा संघर्ष पाहायला मिळणार आहे. युगेंद्र पवार हे अजित पवार यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरले आहेत. राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांनी युगेंद्र यांच्या प्रचारासाठी कान्हेरी येथे सभा घेतली.यावेळी पक्षाच्या फुटीबाबत त्यांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली आणि भाजपसह अजित पवारांवर जोरदार टीका केली.
पक्षाला ‘पळवले’, चिन्हही ‘पळवले’
शरद पवार यांनी आपल्या भाषणात पक्ष फुटीचा उल्लेख करताना भावनांनी भरून आले. “मी राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली आणि आज तोच पक्ष माझ्याकडून हिसकावून घेतला गेला,” असे पवारांनी खंत व्यक्त केली. माझ्यावर न्यायालयात जाण्याची वेळ आली आहे, असे त्यांनी नमूद केले. “कधीही कोर्टाच्या दारात जाण्याची वेळ आली नव्हती, परंतु आता असे घडले आहे,” असे पवार म्हणाले.
राष्ट्रवादी पक्ष काढला, तुम्ही साथ दिली अनेक लोक निवडून दिले. हा पक्ष काढला मी, आणि एक दिवशी काही लोकांनी खेळ केला पक्ष त्यांचा आहे! हे आमचेच लोक होते,ज्यांनी हे केले. मला समन्स काढला, मी गेलो दिवसभर खटला चालू..माझ्या आयुष्यात असे कधी घडले नाही. केंद्रात त्यांचे सरकार काय केलं माहीत नाही पण पक्ष आणि चिन्ह त्यांना देऊन टाकले..पक्ष पळवला, चिन्ह पळवले, असे शरद पवार म्हणाले.
चार वेळा उपमुख्यमंत्री बारामतीचा, आपल्या पक्षाचे सरकार होते! भाजप मदतीने पद का घेतले? मी विरोधी पक्षनेते म्हणून काम केले, लोकांची साथ सोडली नाही! १९७२ विद्या प्रतिष्ठान मी स्थापन केली, युगेंद्र आज त्याचे काम करतो.१९७२ शेती सबंधी संस्था काढली आज ती मोठी झाली. आज राजेंद्र पवार त्यांचे काम बघतात..सहकार्याने या उभ्या केल्या, असे देखील शरद पवार यांनी स्पष्ट केले.
राजकारणात कधी यश असते कधी अपयश असते..सत्ता नाही म्हणून आपल्या सहकाऱ्यांची साथ सोडायची नसते..आमच्या काही लोकांनी उद्योग केले पहाटे उठून शपथ घेतली! राज्यपालांना उठवून सहा वाजता शपथ कशासाठी घेतली. घर मी फोडले म्हणातत, पवार कुटुंब एकत्र राहील ही जबाबदारी आहे माझी आहे. अनेकांना पद दिली, एक पद सुप्रियाला दिलेले नाही, बाकीच्यांना दिले… स्वतःच्या मुलीला दिले नाही, तिने कधी मागितले नाही. हे करताना घर एकत्र ठेवले पाहिजे हाच विचार मनात होता, दुसरा नव्हता, असे म्हणत शरद पवार यांनी अजित पवारांवर निशाणा साधला.
शरद पवार म्हणाले, सगळे संस्थांचे अधिकार त्यांना दिले, ही स्थिती का व्हावी? काल भाषणात म्हणाले घर फोडले, घर फोडण्याचे पाप माझे आई वडील, भावांनी शिकवले नाही. मी कधी घर संसार, शेती बघितली नाही..मी गावभर राजकारण करत बसलो कारण या भावाचे आशीर्वाद होते. कुणी कशी भूमिका घेतली तरी मी कधी अंतर कुणाला दिले नाही.
अजित पवारांची केली नक्कल
सहा महिन्यापूर्वी सुप्रिया निवडणूक होती तेव्हा भाषण होती साहेब भावनेला हात घालतील, डोळ्यात पाणी आणतील, तेव्हा भावना प्रधान होऊ नका! यावेळी शरद पवार यांनी तोंडावरून रुमाल फिरवत अजित पवारांची नक्कल केली. हा पक्ष भावनेचा नाही, हा तत्त्वाचा आहे विचारांचा आहे.गांधी ,नेहरू, यशवंतराव चव्हाण , फुले, शाहू यांच्या विचाराने आम्ही करतो.महाराष्ट्राची सत्ता बदलायची आहे..महाराष्ट्रात मी फिरत आहे, सत्ता सामान्य लोकांच्या हातात द्यायची आहे..शेतकऱ्यांचे जे काम करतात त्यांना सत्ता द्यायची आहे, असे पवार म्हणाले.
मोदींवर टीका – शेती, उद्योग आणि रोजगारांवर भाष्य
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बारामतीमध्ये येऊन शेतकऱ्यांच्या हिताचे भाषण केले असले, तरी त्यांच्या धोरणांवर शरद पवारांनी प्रश्नचिन्ह लावले. “उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळत नसल्यास, तो आमचा सहकारी होऊ शकत नाही,” असे पवार म्हणाले. तसेच, महाराष्ट्रातील औद्योगिक प्रकल्प गुजरातला स्थलांतरित केल्याने राज्यातील हजारो युवकांना रोजगाराच्या संधी गमावण्याची वेळ आल्याचे त्यांनी अधोरेखित केले. “वेदांत-फॉक्सकॉन आणि एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्याने महाराष्ट्रातील नोकऱ्यांवर गदा आली आहे,” असे ते म्हणाले.
शरद पवारांनी सांगितले की, राज्यातील शेतकऱ्यांवर कर्जाचा भार वाढत चालला आहे आणि त्यामुळे शेतकरी अस्वस्थ आहेत. परदेशात सोयाबीन पाठवण्यास बंदी घालण्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, असे त्यांनी नमूद केले. “जे शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत, त्यांना आम्ही योग्य ठिकाणी दाखवल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.
उद्योगपतींच्या योगदानाची दखल
टाटा समूहाने देशाच्या प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावली असून, त्यांच्या निर्णयांमुळे रोजगाराच्या संधी निर्माण झाल्याचे पवारांनी सांगितले. “टाटा समूहाने नागपुरात एअरबसचा कारखाना स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु तो प्रकल्प गुजरातला नेण्यात आला,” असे शरद पवार म्हणाले. पंतप्रधानांनी राज्याच्या हिताऐवजी गुजरातमध्ये अधिक प्रकल्प स्थापन करण्यास प्रोत्साहन दिल्याचा आरोप त्यांनी केला.
पारंपरिक मतदारसंघात मतदारांचा आशीर्वाद मिळणार
बारामतीमध्ये निवडणूक प्रचाराची सुरुवात करण्याची पारंपरिक प्रथा यावेळी देखील पवारांनी कायम ठेवली. “गेल्या ५५ वर्षांत निवडणूक लढताना इथूनच सुरुवात केली आहे. यावेळेस देखील मतदारांचा आशीर्वाद लाभेल, याची मला खात्री आहे,” असे शरद पवार म्हणाले. या सभेत शरद पवारांनी भारतीय जनता पक्षाच्या धोरणांवर टीका करताना शेतकरी, उद्योग आणि रोजगारांवर भाष्य केले.