आष्टी | प्रतिनिधी
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मी पराभूत झालो असलो तरी मला एक लाखापेक्षा जास्त मते मिळाली होती त्याचवेळी भाजपा पक्षश्रेष्ठींनी सांगितले होते की, तुमचे काम चालू ठेवा पुढच्या वेळी तुम्हाला उमेदवारी दिली जाईल परंतु मला उमेदवारी दिलेली नाही त्यामुळे मी अपक्ष निवडणूक लढवणार असून आता निवडणुकीतून माघार घेणार नाही असे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी कडा येथे माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.
याबाबत अधिक माहिती अशी की आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी महायुतीची उमेदवारी कोणाला मिळते याकडे संपूर्ण बीड जिल्ह्याचे लक्ष लागले होते. माजी आमदार सुरेश धस यांना सोमवारी उमेदवारी जाहीर झाली, त्यानंतर कडा येथे मीडियाशी संवाद साधताना माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सांगितले की २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत माजी आ. सुरेश धस यांनी माझ्यासोबत राहून विरोधात काम केले त्यामुळे मला पराभवाला सामोरे जावे लागले आता मी त्यांच्या सोबत राहुन त्यांचे काम कसे करु. त्यावेळी महाराष्ट्रात पराभूत उमेदवारांमध्ये एक लाखाहून अधिक मते मिळालेली भाजपाचे फक्त तीन उमेदवार होते. पक्षश्रेष्ठींनी मला त्याचवेळी सांगितल्याप्रमाणे मी पाच वर्षे लोकांच्या संपर्कात राहून काम केले परंतु मला उमेदवारी दिली नाही. पाच वर्षे लोकांच्या संपर्कात आहे. चार महिन्यापासून मतदार संघात फिरत आहे. मतदारसंघातील वाडी वस्ती पिंजून काढली आहे. मतदारसंघाच्या विकासासाठी आणि लोकाग्रहास्तव मी अपक्ष निवडणुकीत उतरलो असुन आता माघार घेणार नाही. २०१४ ते २०१९ या काळात मी मतदारसंघातील रस्ते विकासाबरोबरच इतरही प्रचंड विकास कामे केलेली आहेत आणि या निवडणुकीत माझा विजय निश्चित आहे असा विश्वास माजी आ. भीमराव धोंडे यांनी व्यक्त केला.