महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस उरले आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीतील घटक पक्षांकडून उमेदवारांच्या घोषणा होत आहेत.मात्र, महायुतीमध्ये अनेक जागांवरील उमेदवारीवरून स्थानिक नेत्यामध्ये मतभेद असल्याचं समोर येत आहे. अनेक मतदारसंघात इच्छुकांच्या आशेवर पाणी फेरल्यानं नाराज नेते बंडखोरीच्या तयारीत आहेत. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं.
महायुतीमध्ये अनेक जागांवरून बंडखोरीची शक्यता आहे, ही बंडखोरी कशी रोखणार? असा सवाल केला असता फडणवीस म्हणाले, बंडखोरी रोखण्याकरिता आम्ही सगळे नेते एकत्रित बसून यावर निर्णय घेऊ. ज्या ज्या पक्षातील नाराज असलेल्यांनी अर्ज भरले, त्या संबंधित पक्षाचे नेते त्यांना अर्ज मागे घ्यायला लावतील. पक्षाने ज्यांना उमेदवारी दिली, तिथं तोच उमेदवार लढत देईल. जिथं कमळ चिन्हावर एखाद्याला उमेदवारी दिली असेल तिथं तोच उमेदवार लढेल. जिथं धनुष्यबाणावर उमेदवारी दिली, तिथं धनुष्यबाणावरच उमेदवार लढेल. महायुती एकच आहे, असं फडणवीस म्हणाले.