बीड |
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार जवळपास मैदानात उतरले आहे. आणखी काही जागांची यादी बाकी आहे. तर दुसरीकडे, लोकसभेला मराठवाड्यात वारं बदलणारे मनोज जरांगे पाटील यांचेही उमेदवार मैदानात उतरले आहे.बीडमध्ये जरांगेंच्या 11 सहकाऱ्यांनी अर्ज दाखल केले आहे.
बीड जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील यांच्या 11 इच्छुक उमेदवारांनी आज बीड विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे, हे सगळे उमेदवार एकत्रितरित्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कार्यालयात दाखल झाले होते. यावेळी मोठ्या संख्येनं मराठा समर्थक सोबत होते. यावेळी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं होतं. बीडमधील एकूण 11 इच्छुक असलेल्या सहकाऱ्यांनी आपले अपक्ष उमेदवारी अर्ज आज एकत्रितरित्या भरले आहेत.
दुसरीकडे, मनोज जरांगे पाटलांनी अंतरवालीमध्ये इच्छुक उमेदवारांच्या बैठका घेतल्यात. त्यानंतर जरांगेंनी आपला अंतिम निर्णय देण्यासाठी 30 तारखेला बैठक बोलावली आहे. 30 तारखेला जो आदेश येईल तो सर्वांना मान्य असेल’ असं उमेदवारांनी म्हटलंय. तसंच या वेळेस क्रांती घडवणार असं इच्छुक उमेदवार गंगाधर काळकुटे यांनी सांगितलं.
बीड लोकसभा निवडणुकीमध्ये मनोज जरांगे यांचे समर्थक बजरंग सोनावणे विजयी झाले होते. त्यांनी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव केला होता. विजय झाल्यानंतर सोनवणे यांनी जरांगेंची भेट घेतली होती. त्यामुळे बीडमध्ये विधानसभेलाही जरांगे फॅक्टर चालणार का हे पाहण्याचं ठरणार आहे.