महायुतीत बंडखोरी होण्याची शक्यता पाहता अमित शहांनी शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांना बंडखोरीच्या पवित्र्यात असलेल्या नेत्यांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या. बंडाच्या विचारात असलेल्यांकडे लक्ष ठेवा आणि त्यांची समजूत काढा. ते मैदानात उतरले तर नुकसान महायुतीचेच होणार आहे, ही बाब ध्यानात ठेवा, असे शहा म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने राज्यात 48 पैकी 30 जागा जिंकत धुरळा उडवून दिला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे जिंकणार असे वातावरण निर्माण झाले.पण गेल्या पाच महिन्यांत महायुती सरकारने निर्णयांचा, योजनांचा धडाका लावला. त्यामुळे राज्यातील परिस्थिती बदलली. सध्याच्या घडीला महाविकास आघाडी आणि महायुतीत काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी महायुतीचे दिल्लीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या भेटीसाठी गेले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत पेच असलेल्या जागांबद्दल चर्चा केली. या जागांबद्दलचा तिढा जवळपास सुटलेला आहे. शहांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत महायुतीचा प्रचार, बंडखोरी याबद्दल सविस्तर चर्चा झाली. विद्यमान आमदारांनाच पुन्हा संधी मिळाल्याने काही ठिकाणी नाराजी आहे. काही जागांवर आतापर्यंत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत होत होती. तिथे दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले नेते नाराज आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याची शक्यता आहे.
हरियाणा विधानसभा निवडणुकीत सगळे अंदाज चुकवत भाजपने विजयाची हॅट्टिक केली. निवडणूक भाजपने जिंकली असली तरी प्रचारादरम्यान बंडखोरांनी पक्षाची चिंता वाढवली होती. हरियाणात जवळपास 60 टक्के आमदारांना तिकीट नाकारण्यात आलं. त्यांच्या जागी नवे चेहरे देण्यात आले. त्यामुळे तिकीट न मिळालेले काही जण विरोधी पक्षाकडे गेले, तर काही जण अपक्ष लढले. हरियाणात झालेल्या घडामोडी पाहता शहांनी महाराष्ट्रात महायुतीत बंडखोरी होऊ नये म्हणून तिन्ही नेत्यांशी सविस्तर संवाद साधला. तिन्ही पक्षांनी मिळून निवडणूक लढवायला हवी. बंडखोरी होता कामा नये. महायुतीमध्ये असलेल्या पक्षांमधून बंडखोरी होणार नाही, याची काळजी घ्या, अशा सूचना शहांनी दिल्या.
महायुतीमध्ये तीन पक्ष आहेत. त्यामुळे इच्छुकांची संख्या मोठी आहे. 2019 मध्ये सेना-भाजपची युती होती. तर काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होती. जिथे सेना, भाजपच्या उमेदवारांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा पराभव केला, त्या उमेदवारांनी 2024 ची तयारी केली होती. पण राष्ट्रवादी महायुतीत गेल्याने त्यांची गोची झाली आहे. अशीच परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांकडून पराभूत झालेल्या शिवसेना, भाजपच्या उमेदवारांची आहे. त्यांच्या मनसुब्यांवर पाणी फिरले आहे.