मुंबई |
नापिकी, शेतमाल मातीमोल भावाने विकावा लागत आहे. त्यातच अवकाळी पावसाने राज्यातील परिस्थिती गंभीर झाली आहे. राज्याच्या कृषीमंत्र्यांच्या मतदार संघात एकाच गावात दोन शेतकरी आत्महत्या करतात, ही लाजीरवाणी गोष्ट आहे. लाखाचा पोशिंदा असणारा शेतकरी अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांच्या जीवावर राज्य चालत, शेतकऱ्यांच्या प्रश्नापेक्षा या सभागृहात दुसर मोठं काहीही नाही, सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर नसल्याचा घणाघाती आरोप करत विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार सभागृहात आक्रमक झाले.
सरकारकडून शेतक-यांना दिलासा नाही
विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, राज्यात शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही. नाफेडकडून खरेदी सुरु असल्याची माहिती सरकार सांगत आहे, मात्र फिल्डवरची स्थिती वेगळी आहे. अजूनही कांदा, हरबरा खरेदी सुरु नाही. सरकार सभागृहाची दिशाभूल करत आहे. त्यातच गेल्या चार दिवसांपासून राज्यात सुरु असणाऱ्या अवकाळी पावसामुळे एक लाख एकर क्षेत्र बाधित झालेले आहे. कापणीला आलेले पीक वाया गेलं आहे. राज्यातला शेतकरी हवालदिल झाला आहे. सरकारकडून कोणत्याही प्रकारचा दिलासा शेतकऱ्यांना मिळत नाही. राज्याच्या कृषीमंत्र्यांच्या मतदार संघात एकाच गावातले दोन शेतकरी आत्महत्या करतात ही अत्यंत लाजीरवाणी बाब आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने ठोस पाऊले उचलण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.